ओमिक्रॉनचा वाढता धोका! मुंबईत कलम 144 लागू, रॅली-मोर्चांना बंदी

0
69

मुंबई: राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार वेगाने होत असून ओमिक्रॉन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी राज्यात आणखी 7 ओमिक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एका तीन वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. राज्यात ओमिक्रॉनचे जे सात रुग्ण सापडले आहेत त्यापैकी तीन रुग्ण हे मुंबईतील आहेत. त्यामुळे ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता मुंबईमधील निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सतर्कता बाळगली जात आहे. मुंबई पोलिसांनी ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर रॅली, मोर्चांना बंदी घातली आहे.

ओमिक्रॉनचा एक रुग्ण धारावी झोपडपट्टीतील आहे. त्यामुळे या परिसरातील दाटीवाटीमुळे ओमिक्रॉनच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. अशामध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रात सापडलेल्या या रुग्णांपैकी चार जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर एका व्यक्तीने एक डोस घेतला आहे. कोरोना लसीचे डोस घेतले असताना सुद्धा त्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. या सात रुग्णांपैकी चार जणांना कोणतीही लक्षणं नाहीत तर इतर रुग्णांना सौम्य लक्षणं आहेत.

मुंबईत दोन दिवसांच्या जमावबंदीचे आदेश दिले आहेत. राजकीय पक्षांना मुंबईत रॅली काढण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. राज्यातील ओमिक्रॉनच्या वाढत्या केसेसमुळे 11 आणि 12 डिसेंबर रोजी मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यामुळे व्यक्ती किंवा वाहनांच्या रॅलीला, मोर्चाला आणि मिरवणुकीला बंदी घालण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here