बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट हिने शुक्रवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे.मुख्यमंत्र्यांनी कंगनाला अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी वापरण्यात आलेले नाणे भेट म्हणून दिले आहे.कंगनाने या भेटीचे फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
कंगनाने आपल्या पोस्टमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यासोबत झालेल्या भेटीबद्दल म्हटले, ‘उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथजी यांना भेटून आनंद झाला. ते अत्यंत चैतन्यशील, साधे आणि प्रेरणादायी आहेत. तरुण, ज्वलंत आणि या राष्ट्रीतील लोकप्रिय नेत्यांपैकी एक असलेल्या योगीजींना भेटणे म्हणजे भाग्य आहे.’
कंगनाने आपल्या दुस-या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘आमचा आगामी चित्रपट तेजसच्या चित्रीकरणास सहकार्य केल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारचे आभार. माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांच्या आगामी निवडणुकांसाठी शुभेच्छा. पहिले आपल्याकडे उत्तर प्रदेशचे तपस्वी राजा श्रीरामचंद्र होते आणि आता आपल्याकडे योगी आदित्यनाथ आहेत.’ कंगनाने या पोस्टसह योगी आदित्यनाथ यांनी तिला रामजन्मभूमी पूजनावेळी वापरण्यात आलेल्या नाण्याचा फोटो शेअर केला आहे.