‘कॉसिस’ ई मोबिलिटी कंपनीला राज्य शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य -उद्योग मंत्री सुभाष देसाई

0
127

मुंबई, दि .1 :- महाराष्ट्र पर्यावरणपूरक शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्याने इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) धोरणाची अंमलबजावणी सुरू केली असून त्याअंतर्गत ई-मोबिलिटी उत्पादन आणि पायाभूत सुविधा विकास क्षेत्रात कॉसिस कंपनी मार्फत गुंतवणूक केली जात आहे. या कंपनीला राज्य शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि ‘कॉसिस’ ई मोबिलिटी कंपनीदरम्यान पुणेजवळ तळेगाव येथे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करण्याबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात सामंजस्य करार करण्यात आला. शून्य उत्सर्जन व पर्यावरणपूरक वाहन निर्मिती क्षेत्राला चालना देण्यासाठी उद्योग विभाग व इंग्लंडच्या कॉसिस इ मोबिलीटी कंपनी यांच्यात २८२३ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी श्री. देसाई बोलत होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंग, विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी अन्बलगन, कॉसिस ग्रुप चे संस्थापक आणि संचालक राम तुमुलुरी आदी उपस्थित होते. एमआयडीसीच्या वतीने पी अन्बलगन यांनी तर कॉसिसच्या वतीने संचालक रवीकुमार पंगा यांनी करारावर स्वाक्षरी केली.

उद्योग मंत्री श्री. देसाई म्हणाले, राज्याच्या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन धोरणाच्या अंमलबजावणीची नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत. यासाठी शासनाच्या वतीने ईव्ही क्षेत्रात गुंतवणुकीसाठी उद्योजकांचे स्वागत करण्यात येत आहे. राज्यात उद्योगांना पोषक वातावरण असून सर्व आवश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. कॉसिस कंपनीलाही संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे सांगून त्यांनी कंपनीचे राज्यात स्वागत केले.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या ईव्ही धोरणाबाबत माहिती दिली. प्रदूषण कमी करणे ही आजची गरज असून बदलत्या तंत्रज्ञानानुसार महाराष्ट्र ई मोबिलिटीकडे वाटचाल करीत आहे. वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने अत्यावश्यक बाबींचा स्वीकार करण्याच्या राज्याच्या धोरणानुसार राज्यात गुंतवणूक करीत असल्याबद्दल त्यांनी कॉसिस कंपनीचे स्वागत केले.

कॉसिसचे श्री.तुमुलुरी आणि श्री.पंगा यांनी मनोगत व्यक्त करताना प्रदूषण मुक्तीसाठी महाराष्ट्राने उद्योग आणि पर्यावरण क्षेत्रात महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सांगितले. राज्याच्या ईव्ही धोरणाची प्रशंसा करून उद्योगांसाठी राज्यातील पायाभूत सुविधाही उत्तम असल्याचे ते म्हणाले. एमआयडीसीकडून व्यावसायिक दर्जाचा प्रतिसाद लाभल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

अपर मुख्य सचिव बलदेव सिंग यांनी प्रास्ताविकात महाराष्ट्र हे परकीय गुंतवणुकीत आघाडीचे आणि उद्योजकांच्या पसंतीचे राज्य असल्याचे सांगितले. राज्यात उद्योजकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येत असून कॉसिसला देखील सर्व सहकार्य केले जाईल, असा विश्वास दिला. पी.अन्बलगन यांनी सर्वांचे स्वागत केले.

कॉसिस मार्फत तळेगाव येथे २८२३ कोटींची गुंतवणूक प्रस्तावित असून या प्रकल्पातून 1250 रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच यामुळे वातावरण बदल नियंत्रण करण्यासही मदत होईल. कॉसिस समुहाद्वारे पहिल्या टप्प्यात ईव्ही बॅटरीचा पुरवठा करण्यासाठी इग्लंड येथे मोठा प्रकल्प उभारण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात कारखाना उभारण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील विकसित इको सिस्टीमला चालना मिळेल व राज्यातील प्रमुख शहरातील सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रीक वाहनांचा वाटा २५ टक्के होण्यास मदत होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here