कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आई/वडील/पालक मयत झाले असतील अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्यात येत आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली.मंत्री श्री.सामंत म्हणाले, अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठीय विभागातील सर्व अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन/उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगेजीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च आकारण्यात आलेला नाही.त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.
प्रयोगशाळा व ग्रंथालय यांची देखभाल व ग्रंथालयामध्ये ई-कन्टेंट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याने याबाबतच्या शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येईल. विद्यार्थ्यांद्वारे व वसतिगृहाचा उपयोग करण्यात येत नसल्याने वसतिगृह शुल्कापोटी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येईल.
विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित महाविद्यालयांद्वारे आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व विकास निधी यामध्ये सवलत देण्यात येणार नाही परंतु इतर शुल्कामधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन/उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगेजीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च आकारण्यात आलेला नाही त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रयोगशाळा व ग्रंथालय शुल्क यामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येईल, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.