गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजप पक्षाने गेल्या सहा महिन्यांत आपले 5 मुख्यमंत्री बदलले आहेत. राजीनामा दिल्यानंतर रुपाणी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. कोणतीही जबाबदारी दिली तरी ती मी पार पाडेन . मला ५ वर्षांसाठी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे असे विजय रुपाणी यांनी म्हटले आहे.राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या एका वर्षाचा कालावधी उरला असताना रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे आता नवे मुख्यमंत्री कोण याकडे सर्वाचें लक्ष असणार आहे.२६ डिसेंबर २०१७ रोजी रुपाणी यांनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
गेल्या काही दिवसांपासून गुजरात सरकारमधील नेतृत्व बदलण्याची चर्चा सुरु होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी रात्री आठच्या सुमारास अचानक अहमदाबादला पोहोचले होते. त्यांच्या गुजरात भेटीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. राज्याचे गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा, महापौर किरीट परमार आणि स्थायी समिती अध्यक्ष हितेश बारोट विमानतळावर अमित शहा यांचे स्वागत करण्यासाठी पोहोचले होते. गुरुवारी रात्री अमित शहा आपल्या बहिणीच्या घरी गेले होते. पण आता विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर अमित शाह हे कदाचित सत्ताबदलाच्या संदर्भातच गुजरातमध्ये आले होते अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
भाजपाने गुजरातमध्ये १८२ पैकी ९९ जागा जिंकून बहुमत मिळवले होते.विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाखाली सरकारची पकड सैल होत असल्याचेही राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे होते.