‘छिछोरे’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा मान मिळाला आहे. आज दिल्लीत 67 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. हा चित्रपट नितेश तिवारी दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला निर्मित आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने यामध्ये नायकाची महत्वाची भूमिका साकारली आहे. साजिद यांनी हा पुरस्कार सुशांत सिंह राजपूतला समर्पित करत एक भावनिक नोट लिहिली.
साजिद यांनी या सोशल मीडियावरच्या नोटमध्ये लिहिले आहे, “आज एनजीईमध्ये आमच्या सर्वांसाठी एक अभिमानाचा क्षण आहे कारण आम्हाला ‘छिछोरे’साठी प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार मिळाला! या विशेष चित्रपटासाठी नितेश तिवारी यांचे आभार! खरोखर आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी मी आभारी आहे आणि हा पुरस्कार मी सुशांत सिंग राजपूतला समर्पित करतो.’ त्यांच्या या नोटचे सुशांतच्या चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे. या चित्रपटाला 65 व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये पाच नामांकनेही मिळाली होती, ज्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट संवाद आणि सर्वोत्कृष्ट संपादन यांचा समावेश होता.