सिंधुदुर्ग – जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे समर्पित कोविड रुग्णालय कार्यरत आहे. या रुग्णालयासाठी एक ऑक्सिजन जनरेशन प्लांट ( पीएसए) ५०० एलपीएम ( प्रतिदिनी ५८ जंबो सिलेंडर्स ७ क्युब मीटर) सप्टेंबर २०२० पासून कार्यरत आहे. दिवसेंदिवस वाढणारी कोविड १९ रुग्णांची संख्या व त्यांना लागणाऱ्या मेडीकल ऑक्सिजनची उपलब्धता होण्याकरिता शासनाने १ नवीन ऑक्सिजन जनरेशन प्लांट ( पीएसए) २०० एलपीएम ( प्रतिदिनी २१ जंबो सिलेंडर्स ७ क्युबीक मीटर) जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे दिलेला आहे.
सदर प्लांट अॅबस्टीम कंपनीचा असून, २३ एप्रिल २०२१ रोजी प्राप्त झालेला असून, या प्लांटचे सर्व तांत्रिक जोडणीचे कामकाज पूर्ण होऊन कार्यान्वित करणेसाठी सज्ज झालेला आहे. या प्लांटमधील ऑक्सिजनचे नमुने तपासणी अहवाल गुणवत्तापूर्वक आलेले असून, आता रुग्णांना उपलब्ध करुन देण्याची तयारी पूर्ण झालेली आहे. या प्रकल्पासाठी एकूण ७०.०० लक्ष ( सत्तर लक्ष) खर्च आलेल असून स्थापत्य, विद्युत कामासाठी रु.७.८० लक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेतून आणि १०० केव्हीए जनरेटर करीता रु. १५.०० लक्ष एवढा खर्च जिल्हा नियोजन समितीचे निधीतून करणेत आलेला आहे.
या दोन्ही ऑक्सिजन जनरेशन प्लांटमुळे कोविड १९ रुग्णांना मेडीकल ऑक्सिजन रुग्णालयातच उपलब्ध झालेला आहे. प्रतिदिनी २० ते २५ कोविड १९ रुग्णांना व्हेंटीलेटरवर उपचार व ९० ते १०० रुग्णांना मेडीकल ऑक्सिजन थेरपीचे उपचार मिळत आहेत. जिल्हा नियोजन समितीने जिल्हा महिला रुग्णालय, कुडाळ, उप जिल्हा रुग्णालय सावंतवाडी व कणकवली या रुग्णालयांसाठी ३ नवीन ऑक्सिजन जनरेशन प्लांट ५०० एलपीएम क्षमतेचे एकूण रक्कम रु.२९७.६६ लक्ष मंजुर केलेले आहेत. सदर पैकी एक प्लांट या महिनाअखेर प्राप्त होऊन जिल्हा महिला रुग्णालय, कुडाळ येथे कार्यान्वित होईल.
मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज एण्ड अॅग्रीकल्चर पुणे यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ५० नवीन ऑक्सिजन कॉनस्ट्रेटर व ५ बायपॅप मशिन प्राप्त झालेली असून त्याचे वितरण आज करण्यात आले. जिल्हा खनिकर्म विकास प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांचे निधीतून नवीन ६ रुग्णवाहिका जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या आहेत व सदर योजनेतून ६ नवीन रुग्णवाहिका लवकरच प्राप्त होणार आहेत.