पोलिसांना आवश्यक सर्व सुविधा पुरविणार– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
49

 जनतेच्या रक्षणाची जबाबदारी पोलिसांवर आहे. पोलिस आपले कर्तव्य चोखपणे बजावित असल्यामुळे आपण सुरक्षित वातावरणात राहतो. त्यामुळे पोलिसाप्रती कृतज्ञता म्हणून राज्य शासन हिताचे विविध निर्णय घेत आहे. पोलिसांच्या मानसिक आणि आर्थिक स्थैर्यासाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

संपूर्ण देशात निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाचा असमतोल होत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनी कोरोनाच्या कठीण काळात साथ दिली, हीच साथ यापुढेही द्यावी.

पेयजल उपलब्धतेसाठी संपूर्ण राज्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याची सोय करण्यात येत आहे. प्रामुख्याने विदर्भातील खारपाण पट्ट्यात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. या संपूर्ण योजनांना निधी उपलब्ध करून देऊन योजना तातडीने पूर्ण करण्यात येतील.

जनतेने मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्यांच्या विनंतीला मान देऊन लवकरच अमरावती जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.मंत्री श्री. पाटील म्हणाले,  पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर प्रति माणसी 55 लिटर पाणी उपलब्ध  होईल. अचलपूर येथील पाणीपुरवठा योजनेला सपन धरणावरून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाण्याचा उद्भव चांगला असल्याने या योजना यशस्वी ठरतील. जलजीवन मिशनच्या माध्यमातून राज्यातील 27 हजार गावातील प्रत्येक घराला पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते अचलपूर आणि सरमसपुरा येथील पोलिस ठाण्याच्या नवीन प्रशासकीय इमारती आणि पोलिस वसाहत, चांदूरबाजार पोलिस ठाणे, शिरजगाव कसबा, पथ्रोट येथील नवीन पोलिस इमारती आणि पोलिस ठाणे, आसेगाव येथील पोलिस वसाहतींचा उद्घाटन आणि लोकार्पण, तसेच अचलपूर तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ८३ गावे प्रादेशिक ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनेचे ई-भूमिपूजन दूरस्थ पद्धतीने करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here