ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात ५ दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते .तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची मुलगी आणि अभिनेत्री मल्लिका दुआ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या (रविवारी) दुपारी 12 वाजता लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विनोद दुआ हे हिंदी पत्रकारितेतील एक प्रसिद्ध चेहरा होते.दूरदर्शन आणि एनडीटीव्हीमध्ये त्यांनी अनेक वर्षे काम केले. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मोठ्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. विनोद दुआ यांना 2008 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केले होते.
मल्लिका दुआ यांनी वडिलांचा फोटो शेअर करत लिहिले “आमचे निडर आणि असाधारण वडील विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. ते एक अद्वितीय आयुष्य जगले. दिल्लीच्या शरणार्थी वसाहतीतून 42 वर्षे पत्रकारितेच्या उत्कृष्टतेच्या शिखरावर पोहोचवताना ते नेहमीच सत्य बोलले. ते आता आमच्या आई, त्याची लाडकी पत्नी चिन्नासोबत स्वर्गात आहे. तिथे ते एकमेकांसाठी गाणे, स्वयंपाक करणे, प्रवास करणे सुरू ठेवतील”.
विनोद दुआ यांना कोविडनंतरच्या आजारांमुळे गंभीर झाल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने खालावत चालली होती. त्यांना काही दिवसांपूर्वी यकृताच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 5 दिवसांपासून ते अपोलो हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल होते.
दुआ यांच्या पश्चात दोन मुली आहेत. दुआ यांच्या पत्नीचा या वर्षी जूनमध्ये कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला होता. दुआंनी देखील कोरोनाशी लढा दिला होता आणि तेव्हापासून त्याचे शरीर अधिकाधिक कमकुवत होत गेले.