टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी दोन दिवसांत 7 पदकांची कमाई केली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे. मात्र भारतीय थाळीफेकपटू विनोद कुमार यांचं कांस्यपदक काढून घेण्यात आलं आहे. विनोद कुमार यांना झालेला विकार हा पॅरालिम्पिकच्या नियमांमध्ये बसत नसल्याचे कारण देत त्याचं पदक काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पॅरालिम्पिक स्पर्धेच्या नियमांनुसार, F52 इव्हेंटमध्ये ज्यांच्या मांसपेशीची क्षमता कमी असते आणि त्यांच्या हालचाली मर्यादित असतात असे खेळाडूच सहभाग घेऊ शकतात. मांसपेशीची क्षमता कमी झाल्याने हातांमध्ये व्यंग येत किंवा पायांच्या लांबीमध्ये फरक असतो. यामुळे खेळाडूला बसून स्पर्धा करावी लागते. पॅरा खेळाडूंचे त्यांच्या आजारानुसार वर्गीकरण करण्यात येते. वर्गीकरण प्रणाली ज्या खेळाडूंना समान आजार आहे त्यांना स्पर्धा करण्यास परवानगी देते. आयोजकांनी 22 ऑगस्ट रोजी विनोद कुमार यांचे वर्गीकरण केले होते. विनोद कुमार हे सीमा सुरक्षा दलाचे (BSf) माजी जवान आहेत. प्रशिक्षण घेत असताना ते लेहमधील एका टेकडीवरून खाली पडले. या अपघातात त्याच्या पायाला दुखापत झाली. यामुळे ते जवळजवळ एक दशक अंथरुणावर झोपून होते.त्यांचे वडीलसुद्धा 1971 च्या भारत-पाक युद्धात लढले होते.
आयोजकांनी हे पदक परत घेताना राष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने ( NPC) भारताचे थाळीफेक खेळाडू विनोद कुमार यांना ‘क्लासिफिकेशन नॉट कम्प्लीटेड’ (सीएनसी) असे कारण देत पदक परत घेतले आहे”. विनोद कुमार यांनी डिस्कस थ्रो एफ-52 फायनलमध्ये 19.91 मीटरसह कांस्यपदक जिंकले होते. टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताचे हे तिसरे पदक होते.भारतीय खेळाडूंनी दोन दिवसांत एकूण सहा पदके मिळविली आहेत.