महाराष्ट्र आणि गुजरातकडे ‘शाहीन’ नावाचे चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. हे चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार होणार आहे. या चक्रीवादळाला ‘शाहीन’ हे नाव ओमान देशाने दिलं आहे. छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रापर्यंत पोहोचणार आहे. 30 सप्टेंबर रोजी अरबी समुद्रावर पोहोचेल. अरबी समुद्रात त्याचं रुपांतर वादळात होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं म्हटलं आहे. हे चक्रीवादळ ‘गुलाब’पेक्षा भयावह असून त्याची तीव्रता जास्त असणार आहे.
आताच गुलाब चक्रीवादळाने महाराष्ट्राला यवतमाळ जिल्ह्यांना झोडपलं आहे. त्यातच आता ‘शाहीन’ नावाचे चक्रीवादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या पश्चिमी किनाऱ्यावर धडकणार असल्याचा अंदाज आहे .पण कदाचित हे वादळ पश्चिमी किनाऱ्यावर धडक न देता ओमानच्या दिशेनेसुद्धा जाऊ शकेल अशी देखील शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मात्र, वादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
बुधवारी पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि जळगाव या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यासह मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, नंदुरबार आणि धुळे या पंधरा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गोंदिया भंडारा आणि गडचिरोली ही तीन जिल्हे वगळता उर्वरित राज्यात आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही तासांत विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.