राज्यातील सर्व मराठी माध्यम शाळांत पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

0
85

मुंबई, दि. 27- राज्यात मराठी भाषेतून शिक्षण अनिवार्य आहे. तथापि, शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच मराठीसोबतच इंग्रजीतील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व मराठी माध्यम शाळांत पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना मराठी बरोबरच इंग्रजी भाषेतील संज्ञा, संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्यात, इंग्रजी भाषेतील शब्दांची ओळख व्हावी, यासाठी प्रा.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे (बालभारती) संचालक विवेक गोसावी हे प्रत्यक्ष तर शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक देवेंद्र सिंग, शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर, शिक्षण संचालक (माध्यमिक) महेश पालकर ऑनलाईन उपस्थित होते.

प्रा.गायकवाड म्हणाल्या, सध्या 488 आदर्श शाळांत प्रायोगिक तत्त्वावर पहिलीच्या अभ्यासक्रमात एकात्मिक व द्वैभाषिक पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. या पथदर्शी प्रकल्पाचे यश पाहता मराठी शाळांत याची अंमलबजावणी करण्यात येईल. त्याचप्रमाणे टप्प्याटप्प्याने पुढील वर्गाच्या अभ्यासक्रमात  इतर शाळांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात येऊन विद्यार्थ्यांना मराठीसह इंग्रजी भाषेतील संज्ञा, दैनंदिन शब्द, संकल्पना स्पष्टपणानं समजाव्यात, मराठी शब्दांच्या जोडीला सोप्या इंग्रजीमधील शब्द, वाक्यांचा उपयोग समजावा अशाप्रकारे पाठ्यपुस्तकांची रचना करावी, असे निर्देश राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाना दिले आहेत. पाठ्यपुस्तकांची रचना आकर्षक, जागतिक दर्जाची असावी, असेही निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here