पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडील दि. 11 ऑक्टोबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहे दिनांक 28 ऑक्टोंबर 2021 पासून नियंत्रित स्वरुपात सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याअनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चित्रपटगृहांविषयी निर्बंध शिथिल करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता देणारे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी दिले आहेत. या आदेशात म्हटले आहे.
कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चित्रपटगृहे सोबतच्या परिशिष्ट अ मधील मार्गदर्शक तत्वांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात सुरू करता येतील. ही परवानगी देण्यामागील शासनाचा उदात हेतू विचारात घेऊन जिल्ह्यातील चित्रपटगृहाचे परिचलन कोविड 19 संदर्भातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या कोणत्याही निर्बंधाचा भंड होणार नाही अशा पद्धतीने करणे आवश्यक आहे. या मार्गदर्शक तत्वांचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास संबधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. कोविड 19 विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील बंधनकारक असणाऱ्या सूचना या प्रकरणीही लागू राहतील.
परिशिष्ठ-अ शासन, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडील अधिसूचना क्र.२०२०/प्र.क्र.६५/सां.का.१, दि.११/१०/२०२१ रोजीच्या आदेशासोबत ब्रेक द चेन अंतर्गत चित्रपटगृहे पुन्हा सुरु करण्याबाबतची प्रमाणित मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure) प्रमाणित कार्यचलन पध्दती १. व्याप्ती : १.१ कोविड-१९ च्या प्रसारास प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने, चित्रपटगृहामध्ये चित्रपट सादरीकरणाच्या दरम्यान निश्चितपणे अंमलात आणावयाच्या विनिर्दिष्ट उपाययोजनांबरोबरच, अंगीकारावयाच्या विविध सर्वसामान्य सावधगिरीच्या उपाययोजनाबाबतची प्रमाणित कार्यचलन या दस्तऐवजांमध्ये नमूद केलेली आहे. १.२ प्रतिबंधित क्षेत्रात (Containment Zone) चित्रपटगृह पुन्हा सुरु करण्याकरिता परवानगी दिली जाणार नाही. १.३ महाराष्ट्र शासनाचा महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, मदत व पुनर्वसन विभाग तसेच सार्वजनिक आरोगय विभाग यांच्या प्रचलित मार्गदर्शक तत्वांनुसार चित्रपटगृहे नियमन केले जाईल. २. चित्रपटगृहे पुन्हा सुरु करण्याबाबतची प्रमाणित कार्यचालन कार्यपध्दती : २.१ महाराष्ट्र राज्यामध्ये चित्रपटगृहे पुन्हा सुरु करण्याबाबतची सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे : सर्वसाधारण उपाययोजना – यामध्ये, कोविड-१९ च्या संसर्गाचा धोका कमी व्हावा याकरिता अनुसरावयाच्या सार्वजनिक आरोग्यविषयक उपाययोजनांचा समावेश होतो. या उपाययोजनांचे सर्वांनी (कर्मचारी तसेच भेटी देणारे) नेहमीच पालन करणे आवश्यक आहे.
या उपाययोजनांमध्ये पुढील बाबींचा अंतर्भाव आहे. १. प्रेक्षागाराबाहेर, सामाईक क्षेत्रांमध्ये आणि प्रतीक्षा क्षेत्रांमध्ये नेहमी किमान सहा फूट इतके पर्याप्त सुरक्षित अंतर राखावे. २. नेहमी तोंडाला मुखपट्टी (मास्क्) बांधणे / कपड्याने तोंड झाकणे (मुखावरण लावणे) अनिवार्य आहे. ३. परिवास्तूच्या प्रवेशाच्या व निर्गमनाच्या मार्गावर तसेच सामाईक क्षेत्रांमध्ये, हात स्वच्छ करण्यासाठी, हाताचा – स्पर्शरहित पध्दतीने घेता येणारे निर्जंतुक द्रव उपलब्ध ठेवावे. ४. श्वसनविषयक शिष्टाचाराने काटेकोरपणे पालन करण्यात यावे. खोकताना / शिंकताना प्रत्येकाने स्वत:चे तोंड व नाक टिप कागदाने (टिश्यु पेपर) / हात रुमालाने / कोपराने पूर्णपणे झाकून घेणे आणि वापरलेल्या टिप कागदाची (टिश्यु पेपर) योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. ५. सर्वांनी स्वत:च्या आरोग्याची स्वत:च देखरेख करावी आणि कोणत्याही आजाराबाबत तात्काळ राज्य व जिल्हा मदत क्रमांकांवर (हेल्पलाईन) कळवावे. ६. थुंकण्यास सक्त मनाई असेल. ७. आरोग्य सेतू सुरक्षित स्थिती दर्शविणारे सर्व अभ्यागतांसाठी प्रवेश अनिवार्य असेल तसेच पर्यायी म्हणून अभ्यागत कोविड लसीकरण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र देखील दाखवू शकतात. ८. सर्व कर्मचारी जसे फुड कोर्ट / वापरकर्ते/साफसफाई सेवांमध्ये कार्यरत वर्गाचे संपूर्ण कोविड प्रतिबंधक लसीकरण (दोन डोस व दुसऱ्या डोस नंतर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणे आवश्यक असेल.) झालेले असणे आवश्यक असेल. ९. शॉपिंग मॉलमध्ये लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश अनुज्ञेय असला तरी अशा मॉलमध्ये असणाऱ्या मल्टीप्लेक्स मध्ये चित्रपटाच्या तिकिटावर आधारित प्रवेश अनुज्ञेय राहील.
२.२ प्रवेश व निर्गमन द्वारे : अ. प्रवेश द्वारावर कर्मचाऱ्यांची/ भेटी देणाऱ्यांची तापमान तपासणी करण्यात यावी. लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच केवळ परिवास्तूत प्रवेश करण्याची मुभा देण्यात येईल. ब. सर्व प्रवेश द्वारांवर आणि कार्यक्षेत्रामध्ये हात निर्जंतुक करण्याची सोय उपलब्ध करण्यात यावी. क. प्रेक्षागाराच्या आणि परिवास्तूच्या प्रवेशाच्या आणि निर्गमनाच्या ठिकाणी प्रेक्षकाकरिता रांगेसाठी आखीव खुणा करण्यात येतील. ड. गर्दी होऊ नये म्हणून लोकांना एकमेकांमध्ये अंतर ठेवून रांगेने बाहेर सोडण्यात यावे. इ. एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये विविध पडद्यांवर तसेच एकल पडद्यावर लागोपाठच्या प्रदर्शनाच्यामध्ये पुरेसा कालावधी ठेवण्यात येईल, जेणेकरून प्रेक्षक रांगेतून, एकमेकांमध्ये अंतर ठेवून आत जाण्याची व बाहेर पडण्याची सुनिश्चिती करता येईल.
२.३ आसन व्यवस्था : अ. चित्रपटगृहाचा वापर त्यांच्या एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक करण्यात येणार नाही. ब. चित्रपटगृहाच्या प्रेक्षागारामधील आसन व्यवस्था ही पर्याप्त सुरक्षित अंतर राखले जाईल अशा प्रकारे केली असली पाहिजे. क. तिकीट आरक्षणाच्या वेळी (ऑनलाईन आरक्षणाच्या आणि तिकीट खिडकीवरील तिकिटांच्या विक्रीच्या अशा दोन्ही वेळी), जी आसने वापरावयाची नसतील त्यावर ” आसनांचा वापर करू नये अशी स्पष्ट खुण करण्यात येईल. टीप :- चित्रपटगृहामध्ये ” आसनांचा वापर करू नये ” अशी खूण केलेल्या आसनांचा लोकांनी वापर करू नये म्हणून त्यांवर एकतर फित लावण्यात येईल किंवा फ्लोरोसेंट मार्करने खूण करण्यात येईल, जेणेकरून नेहमीच पर्याप्त सुरक्षित अंतराची सुनिश्चिती होईल.
२.४ सुरक्षित अंतराबाबतची मानके : अ. वाहनतळ परिसरातील आणि परिवास्तूच्या बाहेरील गर्दीचे योग्य व्यवस्थापन करताना,सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांचे यथायोग्यपणे पालन केले जात असल्याची सुनिश्चिती करण्यात येईल. ब. उद्वाहनांमध्ये सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांचे यथायोग्यपणे पालन करून लोकांची संख्या मर्यादित ठेवण्यात येईल. क. मध्यंतरामध्ये सामाईक जागा, वरांडे (लॉबी) आणि प्रसाधनगृहे या ठिकाणी गर्दी होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. प्रेक्षकांनी मध्यतरामध्ये ये-जा करणे टाळावे याकरिता, त्यांना प्रोत्साहित करण्यात यावे. प्रेक्षागारातील वेगवेगळ्या रांगांमध्ये बसलेल्या प्रेक्षकांना एकमेकांमध्ये अंतर राखून ये-जा करता यावी याकरिता दीर्घकाळाचे मध्यंतर ठेवता येईल.
२.५ शो चे वेळ व स्टेजर्ड : अ. एकाधिक स्क्रीनसाठी गर्दी टाळण्यासाठी शोच्या वेळा वेगवेगळ्या पाळल्या पाहिजेत. ब. कोणत्याही स्क्रीनवर शो सुरू होण्याची वेळ, मध्यस्थीचा कालावधी आणि समाप्तीचा वेळ मल्टीप्लेक्समधील इतर कोणत्याही स्क्रीनवर शो सुरू होण्याच्या वेळ, इंटरमिशन कालावधी किंवा समाप्ती वेळेसह आच्छादित होणार नाही याची दक्षता द्यावी.
२.६ तिकीट आरक्षण व रक्कम भरणा पद्धती : अ. तिकिटे देणे / त्यांची पडताळणी करणे / त्यांची रक्कम भरणे यांकरिता तसेच खाद्य पदार्थ व पेये यांकरिता ऑनलाइन आरक्षण, ई-वॉलेट, क्यूआर कोड स्कॅनर, इ. सारख्या डिजिटल संपर्करहित व्यवहारांना अधिक प्राधान्य दिले पाहिजे. ब. संपर्काचा (व्यक्तीचा शोध घेणे सुकर व्हावे म्हणून तिकीट आरक्षण करतेवेळी संपर्क क्रमांक नोंदवून घेण्यात येईल. क. तिकीट कार्यालयात (बॉक्स ऑफिस) तिकीट खरेदी दिवसभरासाठी सुरू ठेवण्यात येईल. तसेच तिकीट विक्री खिडक्यांवरील गर्दी टाळण्यासाठी आगाऊ तिकीट आरक्षण उपलब्ध करून देण्यात येईल. ड. प्रत्यक्षात खिडकीवर तिकीट काढतेवेळी गर्दीला आळा घालण्यासाठी पर्याप्त सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांचे पालन करून, तिकीट कार्यालयात पुरेशा प्रमाणात खिडक्याची व्यवस्था करण्यात येईल. इ. तिकीट कार्यालयात रांगेचे व्यवस्थापन करताना सुरक्षित अंतर ठेवण्याच्या दृष्टीने जमिनीवर खुणा (फ्लोअर मार्कर्स) करण्यात येतील.
२.७ परिवास्तुचे निर्जंतुकीकरण करणे : अ. संपूर्ण परिवास्तू, सामाईक सुविधा यांचे तसेच लोकांकडून सामाईकपणे हाताळल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी, जसे की, दांडे (handles), कठडे (railing) इत्यादींचे वारंवार निर्जंतुकीकरण केल्याची खात्री करण्यात येईल. ब. प्रत्येक चित्रपटानंतर सिनेमा / थिएटर / मल्टीप्लेक्स सभागृह निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य राहील क. तिकीट कार्यालय, खाद्य – पेयपदार्थ विक्री स्थळे, कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक चीजवस्तूंचे खण, स्वच्छतागृहे, सार्वजनिक जागा आणि अंतर्गत कामकाज पाहणारे कार्यालय (back) office) क्षेत्रे यांची नियमित स्वच्छता व निर्जतुकीकरण केल्याची खात्री करण्यात येईल. ड. निर्जंतुकीकरण करणाऱ्या कर्मचारीवर्गाच्या सुरक्षिततेसाठी उपाय योजण्यात येतील. जसे की, हातमोजे, बूट, मुखपट्टया, व्यक्तिगत संरक्षक साधने (पीपीई) इत्यादीच्या संयुक्तिक वापरासाठी पर्याप्त तरतुदी करण्यात येतील. इ. कोणतीही व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यास, परिवास्तुचे निर्जंतुकीकरण हाती घेण्यात येईल.
२.८ कर्मचाऱ्यांशी संबंधित उपाययोजना : अ. कामाच्या सर्व ठिकाणी कर्मचाऱ्यांनी मुखावरण (फेस कव्हर) लावणे बंधनकारक असून अशा मुखावरणाचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवण्यात यावा. ब. वयस्कर कर्मचारी, गर्भवती महिला कर्मचारी व वैद्यकीय उपचाराधीन कर्मचारी अशा अधिक जोखीम असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी जास्त खबरदारी घ्यावी अशा कर्मचाऱ्यांना लोकांशी थेट संपर्क आवश्यक असणारी व लोकांसमोर जावे लागणारी कामे विशेष करून देण्यात येऊ नयेत. क. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने अधिकाधिक सजग राहण्याचा भाग म्हणून, सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये (मोबाईल) आरोग्य सेतू अॅप स्थापित करून अद्ययावत केले असल्याची नियोक्त्यांनी खात्री केली पाहिजे. ड. सर्व कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ अंतर्गत जास्त खबरदारी घ्यावी व त्याबाबत स्वच्छता, हाताची स्वच्छता इत्यादींशी संबंधित कर्मचाऱ्यांसोबत संवाद करणे आणि त्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. इ. सर्व कर्मचारी जसे फुड कोर्ट / वापरकर्ते /साफसफाई सेवांमध्ये कार्यरत वर्गाचे संपूर्ण कोविड प्रतिबंधक लसीकरण (दोन डोस व दुसऱ्या डोस नंतर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणे आवश्यक असेल.) झालेले असणे आवश्यक असेल.
२.९ जनजागृती : अ. प्रमुख प्रवेश द्वारे, ऑनलाईन, डिजिटल तिकीट विक्री ठिकाणे. तसेच प्रसाधनगृह, लॉबी, यांसारखी सार्वजनिक ठिकाणे येथे काय करावे आणि काय करू नये याबाबतच्या सूचना लावण्यात याव्यात. आ. परिवास्तूच्या आत आणि बाहेर मुखपट्टी लावणे, सुरक्षित अंतर राखणे, हातांची स्वच्छता राखणे याबाबतच्या लोकोपयोगी घोषणा तसेच घ्यावयाची खबरदारी व करावयाच्या उपाययोजना यासंबंधातील विनिर्दिष्ट घोषणा ह्या चित्रपट सादरीकरणापूर्वी, मध्यंतरामध्ये आणि चित्रपटाच्या प्रयोगाच्या शेवटी करण्यात येतील. इ. वरील ठिकाणांच्या बाहेरील बाजूस व आतील बाजूस ठळकपणे कोविड- १९ च्या संबंधातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरील भित्तीपत्रके / उभे फलक / ध्वनीफित वाजविण्यासाठी तरतुदी केल्या गेल्याच पाहिजेत. ई. कोविड-१९ संदर्भातील जनजागृतीकरिता सार्वजनिक आरोग्य विभाग / संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून तयार केलेल्या कोविड-१९ आणि कोविड लसीकरण मोहिमेविषयी जागरुकता संबंधित लघु चित्रपट मध्यंतरीच्या वेळी / शो सुरु होण्यापूर्वी प्रदर्शित करण्यात यावे. “.
२.१०. वातानुकूलन / शीतन व्यवस्था : वातानुकूलनासाठी / वायुवीजनासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुपालन करण्यात येईल ज्यांमध्ये इतर गोष्टींबरोबरच पुढील बाबींवर भर दिलेला आहे. अ. सर्व वातानुकूलन उपकरणांचे तापमान २४ ते ३० अंश सेल्सिअस या मर्यादेत असले पाहिजे. ब. सापेक्ष आर्द्रता ही ४० ते ७० टक्क्यांच्या मर्यादेत असली पाहिजे. क. शक्य होईल तितक्या प्रमाणात हवेचे पुनर्चक्रण टाळण्यात यावे. ड. शक्य होईल तेवढी ताजी हवा मिळण्याची व्यवस्था असली पाहिजे. शो सुरु होण्यापूर्वी काही वेळ दरवाजे उघडे ठेवावेत. इ. समोरासमोरील वायुवीजन हे पुरेशा प्रमाणात असले पाहिजे. ई. स्वच्छतागृहांमध्ये उच्च क्षमतेचे एक्झॉस्ट (Exhaust) पंखे बसवावेत.
२.११ दृश्य लक्षणांबाबत कार्यवाही : कोविड-१९ च्या संबंधातील लक्षणे किंवा बेफिकिर वर्तनाबाबत प्रेक्षागार व्यवस्थापकाच्या / व्यवस्थापकांच्या आणि स्थानिक प्राधिकाऱ्यांच्या समन्वयाने काटेकोरपणे कार्यवाही करण्यात येईल.
२.१२ खाद्य – पेय पदार्थाचे क्षेत्र : अ. वेगवेगळ्या चित्रपट सादरीकरणाचे व मध्यांतर एकाच वेळी होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी सिनेमागृहांमध्ये वेळ निश्चित करणे अनिवार्य आहे. ब. खाद्यपदार्थ मागविण्यासाठी शक्य तितका, चित्रपटगृहात उपयोजक (थिएटर अॅप) / शीघ्र प्रतिसाद संकेतांक (क्यू.आर.कोड) इत्यादींचा वापर करण्यास ग्राहकांना प्रोत्साहन देण्यात येईल. क. अन्न आणि पेय क्षेत्रामध्ये एकाधिक विक्री काउंटर उपलब्ध करा जेथे शक्य असेल तेथे फक्त __ पॅकेज केलेले अन्न आणि पेय विक्रीची परवानगी राहील. ड. प्रत्येक विक्री केंद्रावर सुरक्षित अंतर राखण्यासाठी जमिनीवर चिकट – पट्ट्या (स्टिकर) वापरून एक- रांग पद्धतीचा अवलंब करावयाचा आहे. इ. स्क्रीनिंग सभागृहात कोणतेही खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थांना परवानगी नाही. कोणतेही खरेदी केलेले पॅकेज स्वरुपाचे अन्न आणि शीतपेये खाण्या-पिण्यासाठी केवळ स्क्रीनिंग सभागृहाबाहेरच परवानगी राहील. ई. खाद्यपदार्थाच्या व पेय पदार्थाच्या क्षेत्रात सुरक्षित अंतराचे पालन होत असल्याची व गर्दीला आळा घातला जात असल्याची खातरजमा व्यवस्थापनाकडून करण्यात येईल. उ. खाद्यपदार्थांच्या व पेय पदार्थाच्या कचऱ्याची सुरक्षितपणे विल्हेवाट लावली जात असल्याबाबत परिवास्तूच्या व्यवस्थापनाकडून खातरजमा करण्यात येईल. स्थानिक कोव्हीड -१९ साथरोग परिस्थिती विचारात घेवून संबधित शासकीय यंत्रणांशी विचारविनिमय करून निर्बंधामध्ये वाढ होवू शकेल. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती / आस्थापना शासनाने यापूर्वी लागू केल्यानुसार दंडात्मक कारवाईस तसेच भारतीय दंड विधान संहिता कलम 188, 269, 270, 271 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 सह अन्य तरतुदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील.