सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती निधनाची सखोल चौकशी व्हावी – शिवसेना खासदार संजय राऊत

0
69

भारताचे पहिले संरक्षण दलप्रमुख-सीडीएस जनरल बिपिन रावत यांचा बुधवारी हेलिकॉप्टर कोसळून मृत्यू झाला. तामिळनाडूच्या कोइम्बतूर जिल्ह्याच्या सुलूर एअरफोर्स स्टेशनवरून वेलिंग्टनच्या डिफेन्स स्टाफ कॉलेजकडे जनरल बिपिन रावत हेलिकॉप्टरमध्ये जात होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह एकूण १४ जण होते.अपघातात जनरल रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

हेलिकॉप्टरमधील हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुणसिंह गंभीर जखमी आहेत. बुधवारी दुपारी १२:२२ वाजता झालेल्या या अपघातानंतर जखमींना वेलिंग्टन बेस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. संध्याकाळी हवाई दलाने जनरल रावत व त्यांच्या पत्नीच्या मृत्यूची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. सीडीएस होण्यापूर्वी लष्करप्रमुखपद भूषवलेले जनरल बिपिन रावत यांच्या पश्चात दोन मुली आहेत.

हेलिकॉप्टर अपघातातील मृतांत जनरल रावत व त्यांच्या पत्नीसह ब्रिगेडियर एल.एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह, नायक गुरुसेवकसिंह, नायक जितेंद्रकुमार, लान्सनायक विवेककुमार, लान्सनायक बी.साई तेजा, हवालदार सतपाल, विंग कमांडर पृथ्वीसिंह चौहान (पायलट), स्क्वॉड्रन लीडर के. सिंह (को-पायलट), ज्युनियर वॉरंट ऑफिसर दास व ज्युनियर वॉरंट ऑफिसर ए.प्रदीप यांचा समावेश आहे. हेलिकॉप्टरमधील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे डायरेक्टिंग स्टाफ ग्रुप कॅप्टन वरुणसिंह यांची प्रकृती गंभीर आहे.

संरक्षण दलांच्या सर्वोच्च अधिकारीपदी असताना अशा दुर्घटनेत मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. हवाई दलाने तपास सुरू केला आहे. अपघाताचे वृत्त आले तेव्हा केंद्रीय कॅबिनेटची बैठक सुरू होती. संरक्षणमंत्री राजनाथसिंह बैठकीतून थेट जनरल रावत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले. बुधवारी सायंकाळी सुरक्षा प्रकरणांच्या कॅबिनेट समितीच्या बैठकीत सदस्यांनी जनरल रावत यांना श्रद्धांजली वाहिली. जनरल रावत व त्यांच्या पत्नीचे पार्थिव गुरुवारी दिल्लीत आणले जाईल. शुक्रवारी दिल्लीतील कँटममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. सरकार गुरुवारी प्रकरणावर संसदेत निवेदन करणार आहे.

जनरल रावत यांनी सीडीएस म्हणून १ जानेवारी २०२० ला पदभार स्वीकारला होता. १ जानेवारी २०२२ ला त्यांना या पदावर २ वर्षे पूर्ण होणार होती. ते बुधवारी दिल्लीहून सकाळी ८:४७ वाजता विशेष विमानाने कोईंबतूरला आले. येथून ते वेलिंग्टनच्या डिफेन्स स्टाफ कॉलेजमध्ये लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणंेसोबत एका कार्यक्रमात सहभागी होणार होते. सुलूर एअरफोर्स स्टेशनहून ते एमआय-१७ व्ही ५ हेलिकॉप्टरमधून वेलिंग्टनसाठी रवाना झाले. सकृतदर्शनी मानले जात आहे की, दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होती. यामुळे हेलिकॉप्टर कोसळले अन् त्याने पेट घेतला. घटनास्थळी दाखल झालेले तामिळनाडूचे वनमंत्री के. रामचंद्रन म्हणाले, अपघात इतका भीषण होता की, मृतदेह पार जळून गेलेले होते. जिल्हाधिकारी एस.पी अमृथ यांच्यानुसार, डीएनए तपासणीनंतरच १३ जणांच्या मृतदेहांची ओळख पटू शकेल. घटनेनंतर सर्वात आधी स्थानिक लोकांनी पेटलेल्या हेलिकॉप्टरमधून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. काही वेळेनंतर लष्कराची बचावमोहिम सुरू झाली.

सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती निधनाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. बिपिन रावत प्रवास करत असलेले हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित मानले जाते तरी सुद्धा त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला.या अपघाताबद्दल देशवासियांच्या मनात शंका आहे. या घटनेमुळे काल देशाचे सर्वोच्च नेतृत्व सुद्धा गोंधळले असेल त्यांच्या मनात सुद्धा काही शंका निर्माण झाल्या असतील याची मला खात्री आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here