केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत साहित्य अकादमीने फेलोशिप व वर्ष २०२० च्या अनुवाद पुरस्कारांची घोषणा केली. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त भालचंद्र नेमाडे यांना मराठी भाषेतील साहित्यिक योगदानासाठी साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर झाली आहे. ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप. विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
डॉ.प्रकाश आमटे यांच्या ‘प्रकाशवाटा’ या आत्मकथनाच्या संस्कृत भाषेतील ‘प्रकाशमार्गा:’ या अनुवादित पुस्तकासाठी लेखिका मंजुषा कुलकर्णी यांना संस्कृत भाषेतील सर्वोत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार जाहीर झाला. सन्मानचिन्ह, ५० हजार रुपये, ताम्रपत्र असे अनुवाद पुरस्काराचे स्वरूप आहे.
मराठी लेखिका सोनाली नवांगुळ यांनी अपंगत्वावर मात करत साहित्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. लेखिका सलमा यांच्या ‘इरंदम जामथिन कथाइ’ या तामीळ भाषेतील कादंबरीचे मराठीत अनुवादित केलेल्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
सोनाली नवांगुळ व डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी प्रतिकूल परिस्थितीवर धैर्याने मात करीत पुरस्कार प्राप्त केल्याचे समजून विशेष अभिमान वाटला. उभय लेखिकांचे हार्दिक अभिनंदन करतो व भविष्यातही त्यांचेकडून साहित्यसेवा घडो या शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या अभिनंदनपर पत्रात म्हटले आहे.