आज शिक्षकदिन. आपल्या परमपूज्य व पवित्र शिक्षकांच्या चरणांवर लीन होण्याचा, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. या दिनी मी माझ्या आयुष्यात मला लाभलेल्या सर्व शिक्षकांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आणि त्यांना सविनय प्रणाम करतो.
‘ गुरुविन कोण दाखविल वाट? ‘ या उक्तिप्रमाणे बालपणी प्राथमिक शिक्षण घेताना सर्वच गुरुजींनी, बाईंनी दाखविलेल्या मार्गावरून आजही वाटचाल करीत असताना बालपणी पाहिलेल्या शिक्षकांचे चेहरे डोळ्यांसमोर उभे राहतात. शिक्षक आणि विद्यार्थी हे पवित्र नाते जपताना आजच्या दिवशी मला घडविलेल्या सर्वच शिक्षकांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
प्राथमिक शाळेत आम्हाला छडीचा ‘ प्रसाद ‘ देणाऱ्या गुरुजींना आम्ही ‘ मारकूटे ‘ गुरुजी म्हणायचो. कधी कधी अशा गुरुजींचा रागही यायचा. पण पुर्वसंचित किंवा योगायोगाने आम्हीदेखील पुढच्या काळात ‘ गुरुजी ‘ झालो तेव्हा कळले की, शिक्षक हा प्राणी काही विद्यार्थ्यांचा दुश्मन किंवा शत्रू नसतो. आपला विद्यार्थी पुढील आयुष्यात आवश्यक ते शिक्षण व्यवस्थित पूर्ण करूनच पुढे जावा, त्याला पुढील आयुष्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रत्येक शिक्षक झटत असतो. जसे आम्हाला आमच्या बालपणात आमच्या शिक्षकांनी योग्य संस्कार करुन, योग्य शिक्षण देऊन घडविले, तसेच आमच्याही मार्गदर्शनाखाली अनेक गरीब व होतकरु विद्यार्थी पुढे आले; त्यांच्या आयुष्यात पुढे गेले याचे समाधान वाटते. कधी नकळत एखाद्या प्रसंगी आम्हालाही हातात छडी घ्यावी लागली असेल. पण आज व्यवस्थित प्राथमिक शिक्षण घेऊन सध्या उच्च शिक्षण घेणारी कल्याणी नावाची माझी विद्यार्थीनी म्हणते, “सर, तुम्ही आमच्या चांगल्यासाठीच आम्हाला एखाद्या वेळेस शिक्षा केली असेल. दारुड्या बापाने ‘ सौदा ‘ केलेली अमित, अंकुश, तेजल यांसारखी गरीब मुले केवळ माझ्यामुळेच शिकून-सवरून मोठी झाली आणि आज व्यवस्थित स्थिरस्थावर झाली याचा माझ्यातल्या शिक्षकाला नेहमीच अभिमान वाटतो. सुलोचना, दर्शना यांसारख्या दोघी बहिणी त्यांच्या अशाच दारुड्या बापाच्या कचाट्यातून सुटल्या आणि आमच्या शाळेत विसावल्या, त्यांच्या मामा-मामीच्या पंखांखाली वाढत शिकून पुढे गेल्या हे आमच्यासाठी ‘ आदर्श शिक्षक ‘ पुरस्काराच्या मोलापेक्षाही मोठे वाटते. आज आमचे काही विद्यार्थी गावातल्या माझ्या मराठी शाळेत शिकून पुढे गेले आणि पुढे परदेशातही गेले. आता कधी मायदेशात, गावात आले की आवर्जून मला भेटून नतमस्तक होऊन जातात यापेक्षा आणखी काय हवे शिक्षक नावाच्या प्राण्याला?
काळ आता बराच पुढे सरकला आहे. पुर्वीसारखे समाजातले शिक्षकाचे स्थान आता ‘ अढळ ‘ दिसत नाही. यासाठीच्या विविध कारणांचा उहापोह करण्याचा आजचा दिवस नाही. नानाविध अशैक्षणिक कामांच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या शिक्षकाकडून गुणवत्तापूर्ण अध्यापनाची अपेक्षा करताना आज कोणालाही काही वाटत नाही. पुर्वीसारखे दिवसभर वर्गात मुलांमध्ये मिसळणे, शिकविणे आजच्या शिक्षकास शक्य होत नाही. अनेक प्रकारची प्रशिक्षणे, ऑनलाईन परिसंवाद, सर्वेक्षणे, आपत्कालीन कामे करता करता आजचा ‘ मास्तर ‘ मेटाकुटीस आला आहे. ‘ कुणीही यावे आणि टपली मारून जावे ‘ अशी आजच्या मास्तरांची स्थिती अनेकदा पाहवत नाही. अर्थात ही स्थिती अशी अकस्मात झालेली नाही. बदलत्या काळात समाजाची विचारसरणी, शिक्षकाकडे बघण्याचे दृष्टीकोन कमालीचे बदलले आहेत. ग्रामीण भागात दिवसागणिक रोडावत चाललेली विद्यार्थी पटसंख्या, खाजगी शाळांचे गावोगावी फुटलेले पेव, समाजाची मराठी शाळांबद्दलची मानसिकता यापुढील काळात ‘ गुरुजींना ‘ कुठे नेऊन ठेवील सांगता येत नाही. पुढील काळात शिक्षक दिनादिवशी शिक्षक ‘ दीन ‘ झालेला पहावे लागू नये हीच आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने प्रामाणिक अपेक्षा व्यक्त करावीशी वाटते.


