विजयदुर्ग ते देवगड दरम्यान 40 ते 45 वाव पाण्यात पार्थ हे 101 मी. लांबीचे तेल वाहू जहाज 16 सप्टेंबर रोजी अपघातग्रत झाले आहे. सदर अपघातात जहाजावरील 19 खलाशी यांना वाचविण्यात यश आले आहे. या घटनेच्या अनुषंगाने कमाडंट कोस्ट गार्ड रत्नागिरी यांचेकडून प्राप्त माहितीनुसार बुडालेल्या जहाजावर कोस्ट गार्डची यंत्रणा लक्ष ठेवून आहे. अद्याप सदर जहाजातून कोणत्याही प्रकारे तेल गळती सुरु झालेली नाही. अशी माहिती कोस्ट गार्ड रत्नागिरीचे कमांडट यांनी दिली.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही माहिती आवश्यक असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या ०२३६२-२२८८४७ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.
हे तेलवाहू जहाज असल्याने या जहाजातून तेल गळती झाल्यास विजयदूर्ग ते मालवण भागात तेल प्रदूषण होण्याची शक्यता आहे. मात्र अशी तेल गळती झाल्यास त्यावर त्वरीत उपाययोजना करता यावी या करीता कोस्ट गार्डचे एक जहाज 24X7 परिस्थितीचे निरीक्षण करीत आहे. तेल गळती होऊन तेल समुद्र किनाऱ्यावर येवू नये याकरीता आवश्यक ती खबरदारी कोस्ट गार्ड करुन घेण्यात येत आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय मालवण, तहसिलदार देवगड, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन देवगड यांना संयुक्तरित्या स्थळ पाहणी करुन अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांना सादर करण्याच्या तसेच सदर घटनेच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये कोणत्याही अफवा पसरणार नाहीत याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्याकडून देण्यात आली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय मालवण यांनी आवश्यक त्या सूचना मच्छिमार सोसायट्यांना निर्गमित केलेल्या असून परवाना अधिकारी देवगड, मालवण व वेंगुर्ला यांना मुख्यालय न सोडणे बाबत आदेशित करण्यात आलेले आहे. प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला यांच्याकडून सदर जहाजाच्या मालकाला सदर बाबत नोटीस देण्यात आलेली आहे. सदर जहाजात सद्यस्थितीत डांबर साठा असून हा साठा पाण्याच्या तळाशी जावून बसणार आहे. त्यामुळे तेल गळतीचा धोका कमी असल्याचे प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला यांनी सांगितले आहे. मात्र तेल गळती झाली किंवा कसे याची पाहणी करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रत्नागिरी यांना कळविण्यात आलेले असून समुद्राच्या पाण्याची तपासणी करून सदर बाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत


