प्रतिनिधी: अभिमन्यू वेंगुर्लेकर
वेंगुर्ले- वेंगुर्ले येथील महिलेचे फेसबुक अकाउंट हॅक करून तिच्याकडून अश्लील भाषेत संभाषण करून तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे मागितल्या प्रकरणी वेंगुर्ले पोलिसांनी सापळा रचून शामनगर लातूर येथून अजय किसनराव मुंडे वय २८ याला शिताफीने शिर्डी येथे ताब्यात घेतले आणि अटक केली, अशी माहिती वेंगुर्ले चे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.
निवती पोलीस ठाण्यात पीडित महिले कडून आलेल्या तक्रारीवरून २८ नोव्हेंबर २०२१ रोजी या अज्ञात गुन्हेगाराविषयी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. १४ नोव्हेंबर २०२२ रोजी घडलेल्या या प्रकाराबाबत त्या पीडित महिलेने सविस्तर माहिती निवती पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी भा.द.वि. कलम 420, 354 (ड)(2) आयटी ॲक्ट 66 – ड – 67 नुसार गुन्हा दाखल केला होता. फेसबुक अकाउंट वर ओळख करून लिंक पाठऊन त्या महीलेचे प्रथम अकाउंट हॅक करण्यात आले. त्यानंतर अश्लील संभाषण केले आणि घाबरऊन अश्लील फोटो पाठवायला लावले. तसेच नाही पाठविले तर जुने तुमचे अश्लील फोटो व्हायरल करीन अशी धमकी देऊन पैसे मागितले.
या प्रकारामुळे घाबरलेल्या त्या महिलेने निवती पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या केसचा तपास वेंगुर्ल्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, सायबर विभागाचे ए आर सुतार यांच्या मार्गदर्शनानुसार तपास यंत्रणा हलविली. वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दाभोलकर पोलीस नाईक वेंगुर्लेकर, सुरेश पाटील, चालक चोडणकर या पथकाला लोकेशन नुसार या प्रकरणातील आरोपीच्या मागावर पाठविले. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित आरोपी अजय मुंडे हा पुणा, आळंदी, कोथरूड, नाशिक मार्गे शिर्डी येथे चार चाकी गाडीने जात असल्याचे खात्रीशील समजले. त्याचा पाठलाग करत स्थानिक पोलिसांच्या मदतीने शिर्डी येथे त्याने पार्किंग केलेल्या जागेवर गाडीत बसण्यासाठी तो पुन्हा येताच त्याला पकडले.
दरम्यान फेसबुक वर महिलांची अकाउंट हॅक करून त्यांच्याकडून पैसे लाटणे हाच अजय मुंडे याचा धंदा आहे. या संशयित आरोपीला पकडण्यात आम्हाला यश आले आहे. मात्र महिलांनी, युवतींनी तसेच सर्वच नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना सावधानता बाळगावी, आमिशांना बळी पडू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले आहे.


