सिंधुदुर्ग: वैभववाडी तालुक्याच्या परिसरात पावसाला जोरदार सुरुवात; करूळ- भुईबावडा घाटातील धबधबे झाले प्रवाहित

0
42

प्रतिनिधी- वैभववाडी ( मंदार चोरगे.)

वैभववाडी – काल पासून वैभववाडी तालुक्याच्या परिसरात पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. परिणामी निसर्गाने मुक्तपणे उधळण केलेल्या निसर्गरम्य करुळ व भुईबावडा घाटातील छोटे-मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. पर्यटकांना भुरळ घालणारा घाट रस्ता म्हणून करुळ व भुईबावडा घाटमार्गाची ओळख आहे. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे पर्यटकांनी गेली काही वर्षे या धबधब्यांकडे पाठ फिरविली होती.

तालुक्यासह जिल्ह्यात काल पासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे करुळ व भुईबावडा घाटातील सर्वच धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. हिरव्यागार पर्वतरांगा त्यावर निसर्गाने पांघरलेली दाट धुक्याची पसरलेली चादर, उंच कड्याकपारीतून खोल दरीत कोसळणारे धबधबे, हिरव्यागार पर्वतरांगेतून नागमोडी वळणे घेत जाणारा रस्ता. घाटामार्गातून जाताना अंगाला झोंबणारा गार वारा, त्यातूनच अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी या सर्व निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी प्रमाणे या वर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक घाटात दाखल होणार आहेत. भुईबावडा घाट हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला घाटमार्ग आहे. मात्र घाटमार्ग अरुंद असल्याने पर्यटकांना अतिशय काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा लागतो. करुळ घाटमार्गात पर्यटकांना उभे राहण्यासाठी पिकनिक पॉइंट आहे. त्याचप्रमाणे भुईबावडा घाटात असा पॉईंट विकसित करणे गरजेचे आहे.

भुईबावडा व करुळ हे दोन्ही घाट वाहतूकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याचप्रमाणे पर्यटनदृष्ट्या तितकेच महत्त्वाचे आहेत. विशेषतः पावसाळी पर्यटनाला या घाटांना खूपच महत्त्व आहे.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here