ओरोस: जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील नागरी भागात आरोग्य सेवा पुरविणाऱ्या खासगी रुग्णालयांना महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी अधिनियमान्वये नोंदणी शासकीय रुग्णालयाकडून देण्यात येते. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी (सुधारित) अधिनियम 2021 कायद्याच्या कलम 11 अ नुसार रुग्ण हक्क सनदेनुसार माहिती प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. शुश्रुषागृहात दाखल रुग्णांना रुग्णांना असणारे हक्क यामध्ये समावेश असतील, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. व्ही. जगताप यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-तालुका-स्कूलमध्ये-बांधक/
रुग्णाच्या आजाराबाबतची माहिती, आजाराचे स्वरूप, आजाराचे कारण, प्रस्तावित उपचार घ्यावयाची काळजी, उपचाराचे अपेक्षित परिणाम, अपेक्षित गुंतागुंतीची शक्यता व उपचाराचा अपेक्षित खर्च इत्यादी माहिती जाणून घेण्याचा हक्क रुग्णास किंवा त्याने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस अथवा त्याच्या जवळच्या नातेवाईकास असेल. स्त्री रुग्णाची तपासणी महिलेच्या उपस्थितीत केली जाईल. एच.आय.व्ही./एड्स झालेल्या व्यक्तीस उपचार व देखभालीचा हक्क असेल. रुग्णाला संबंधित शुश्रुषागृहाच्या स्वागत कक्षात ठेवलेल्या तक्रार नोंदवहीत तक्रार लिहिण्याचा अधिकार असेल. शुश्रूषागृहात कार्यरत वैद्यांचे नाव, त्यांची शैक्षणिक अर्हता, भारतीय वैद्यक परिषद / महाराष्ट्र वैद्यक परिषदेचा नोंदणी क्रमांक आणि त्याचा वैधता, दिनांक दर्शवणारी यादी शुश्रुषागृहाच्या स्वागत कक्षाजवळ ठळकपणे दिसेल अशा ठिकाणी असेल.
दुसरे मत (Second-opinion) घेण्याचा हक्क रुग्णाला असेल. यासाठी आवश्यक सर्व वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल रुग्णास अथवा त्याने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस उपलब्ध करून दिले जातील. शुश्रूषागृहातील दाखल रुग्णाला किंवा त्याने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस त्याचे वैद्यकीय अभिलेख नेहमी उपलब्ध असतील. आंतररुग्ण कागदपत्रांची छायांकित प्रत मागणीनुसार उपलब्ध असेल. रुग्णाला सुट्टी देताना रोगनिदान, वैद्यकीय निष्कर्ष, चाचण्यांचे अहवाल, दिलेले उपवार, सुट्टी देतेवेळी रुग्णाची स्थिती व पुढील सल्ला याचा उल्लेख असलेले डिस्चार्ज कार्ड दिले जाईल. पुरविण्यात येणाऱ्या सेवा, विविध उपचार, त्यांचे आकारण्यात येणारे सर्व प्रकारचे दर विस्तृतपणं दर्शविणारे दरपत्रक अथवा अनुसूची- III मध्ये नमूद केलेल्या विशिष्ट दराची यादी छापील स्वरूपात शुश्रुषागृह मुख्य दर्शनी भागात ठळकपणे लावेल, मात्र दर शासनाने वेळोवेळी अधिसूचित केलेल्या दराशी सुसंगत असेल. दाखल करतानाच्या हमीपत्रानुसार संबंधित शुश्रुषागृहाने प्रदर्शित केलेल्या दरपत्रकानुसार दिलेल्या आरोग्य सेवेबाबतच्या देवकाची प्रतिपूर्ती करण्याची जबाबदारी संबंधित रुग्ण व त्याचे नातेवाईक यांची राहील. आरोग्य सेवा पुरवठादार आणि वैद्यक यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची हिंसा करण्यास रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक यांना प्रतिबंध असेल. तसेच रुग्ण व त्याचे नातेवाईक शुश्रुपागृहाच्या स्वच्छता व सुरक्षाविषयक नियमांचे पालन करतील.