Kokan: Top News: तामिळनाडू चेन्नईच्या ‘रेन ट्री’ पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘चैतन्य’च्या मालवणी पदार्थांचा २५ ते ३० जून दरम्यान महोत्सव!

0
49
Hotel Chaitanya,
तामिळनाडू चेन्नईच्या 'रेन ट्री' पंचतारांकित हॉटेलमध्ये 'चैतन्य'च्या मालवणी पदार्थांचा २५ ते ३० जून दरम्यान महोत्सव!

मालवणी पदार्थांची अस्सल चव चाखण्यासाठी तामिळी खवय्यांची उत्सुकता शिगेला!

चैतन्या’च्या सुरेखा वाळके आणि नितीन वाळके, सायली वाळके, मालवण चैतन्यचे chef प्रथमेश कुलकर्णी खाऊ घालणार अस्सल  मालवणी पाककृती!

“माणसाच्या मनात शिरण्याचा मार्ग पोटातून जातो” असं म्हणतात. एखाद्या माणसाला खाण्यातून जिंकलं तर मनाने जिंकणं फारसं कठीण नसतं. या सूत्राने गेली ३० वर्षांपासून वैविध्यपूर्ण मालवणी रुचकर-लज्जतदार पदार्थांवर खाद्यसंस्कार करून मालवणी खाद्यसंस्कृतीचा समृद्ध वारसा जोपासणाऱ्या सुरेखा व नितीन वाळके यांनी जातीवंत खवय्यांच्या मनात अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांनी बनवलेल्या मालवणी पदार्थांची चव चाखण्यासाठी ‘चैतन्य’ या खाद्यगृहात खवय्यांची दररोज झुंबड उडत असते. ‘चैतन्य’ मधील मालवणी पदार्थांचा लौकिक केवळ मुंबई, महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून तो देशासह जगभरातील खाद्यप्रेमींच्या जिव्हाळ्याचा बनला आहे. ‘मालवणी जेवणाचा ट्रेण्ड सेटर असलेल्या लोकप्रिय ‘चैतन्य’च्या स्वागतासाठी थेट ‘चेन्नई’चे ‘रेन ट्री’ हे पंचतारांकित हॉटेल रेड कार्पेट घेऊन सज्ज झाले आहे. तामिळनाडूच्या चेन्नईतील अस्सल खवय्यांना मालवणी पदार्थांची खरी चव २५ जुन ते ३० जून या दिवसात चाखता येणार आहे. “The Taste of Malvan”  या नावाने ‘रेन ट्री’ या तारांकित हॉटेलमध्ये ‘मालवणी खाद्य महोत्सवाद्वारे ‘चैतन्य’च्या सर्वेसर्वा सुरेखा वाळके आणि नितीन वाळके, चैतन्य व्हेंचर्सच्या मार्केटिंग व संशोधन प्रमुख सायली वाळके, मालवण चैतन्यचे chef प्रथमेश कुलकर्णी हे चेन्नईतील खवय्यांना मालवणी पाककृती खिलवणार आहेत.https://sindhudurgsamachar.in/kokan-चंद्रनगर-शाळेत-आंतरराष्/

३० वर्षांपूर्वी मालवण सारख्या छोट्याश्या गावात सुरेखा व नितीन वाळके यांनी चैतन्य अस्सल मालवणी ची सुरवात केली. मालवणी जेवण तेव्हा आजच्या सारखा सर्वश्रुत नव्हत. ते घरगुती पद्धतीचे जेवण हेच त्याच वर्णन. हे घरगुती जेवण वाढणाऱ्या खानावळी कधीच गावाची वेस ओलांडू शकल्या नाहीत. एकेकाळी मालवणमध्ये येणाऱ्या कित्येक लोकांना खाऊ घालणाऱ्या या खानावळी बंद पडत जाण्याचा तो काळ होता. अश्यातच चैतन्यची स्थापना झाली ती ‘अस्सल मालवणी भोजनगृह’ अश्या caption खाली. तेथ पासून ते आजपर्यंत चैतन्यची ओळख  अगदी ब्रॅण्डिंग पासून ते मेन्यू पर्यंत मालवणी जेवणाचे ट्रेण्ड सेटर अशीच राहिली आहे.  आज मालवणी म्हटलं कि अस्सल हे विशेषण सहजच वापरल जातं आणि हे विशेषण जनमानसात रुजविण्याचं पूर्ण श्रेय चैतन्यला जात यात तिळमात्र हि शंका नाही.

घरच्या स्वयंपाक घरातुन कधीच बाहेर न येऊ शकणाऱ्या पाककृतींना व्यावसायिक दृष्ट्या ग्राहकांपर्यंत यशस्वीपणे पोहोचवण्यात ‘चैतन्य आजही अव्वलच आहे. तिरफळ घातलेलं माश्याच तिखलं, माश्याच्या जेवणाबरोबर पाल्याची भाजी, कुळिथाची पिठी, शिरवाळे, नाचणीचा हलवा, चिकनची सुक्की सागोती, ओल्या काजूची उसळ, आंब्याचं रायतं, कुयरीची भाजी आणि तव्यावर कमी तेलात भाजलेले मासे – अश्या अनेक अस्सल मालवणी पदार्थांची चव चैतन्यने जगाला चाखवली; आणि नुसती चाखवली नाही तर त्याच्या प्रेमात पडायला भाग पाडलं.

अर्थातच आपल्या जेवणाची ताकद ओळखून तेवढ्याच ताकतीने ते खवय्यांपर्यंत पोहोचवणं यामागे ३ दशकांचं संशोधन, मेहनत, विचार, जिद्द आणि त्याग सर्व काही आहे. चैतन्यची अन्नपूर्णा सुरेखा वाळके यांचा आपल्या जेवणाचा तगडा अभ्यास – पाण्याची चव, मिठाचा पोत, नारळाचा दर्जा, मसाल्याचा दर्जा, त्याचं प्रमाण, तापमान, त्याच बरोबर मालवणी पाककृतींमध्ये ऋतू व ठिकाण परत्वे होणारा बदल यांचा अभ्यास, कच्च्या मालाची पुरवठा साखळी आणि सोबतीला नितीन वाळके यांची दूरदृष्टी, विपणन कला, सोबत २०० हुन अधिक सेवा पुरविणारे हात आणि ज्याची गणतीच नाही असे चवीने खाणारे खवय्ये हे  चैतन्यचे आधारस्तंभ आहेत.

मालवण ते मुंबई असा प्रवास करत घरगुती जेवणाला अस्सल मालवणी ते Authentic Malvani Cuisine अशी ओळख निर्माण करण्यापर्यंतची मजल चैतन्य ने मारली आहे. आज यात अजून एक नाविन्यपूर्ण गोष्टीची भर पडत आहे. चैतन्यला बोलावणे आले आहे थेट चेन्नईच्या ‘रेन ट्री’ हॉटेल कडून, त्यांच्या येथील खवय्यांना अस्सल मालवणी चव चाखविण्यासाठी. २५ जुन ते ३० जून या दिवसात एक मालवणी खाद्य महोत्सव – The Taste of Malvan या नावाने रेन ट्री या तारांकित हॉटेल ने आयोजित केला आहे. हा अनुभव ‘द सोल ऑन द प्लेट’च्या योगिता उचित यांनी जुळवून आणला आहे. ५ दिवसांच्या या POP-up पद्धतीच्या कार्यक्रमात सेट मेनू म्हणजेच थाळी व बुफे अश्या दोन्ही तऱ्हेने चेन्नईचे खाद्य रसिक मालवणी जेवणाचा आस्वाद घेतील. मालवणी मसाल्यातील बटाटे वडे ते ओल्या काजूची उसळ, कुळथाची पिठी ते माश्याच तिखलं, आमटी, भाजलेले मासे, भरलेले पापलेट, कोळंबी भात ते चिकन सागोती, वडे, भाकरी आणि मालवणी जेवणाची भैरवी सोलकढी अशी रेलचेल असेल. असं हे दुसऱ्या राज्यातुन बोलावणं येणं हा चैतन्यचा सन्मान जरूर आहे, पण त्याहूनही मोठा तो आमच्या जेवणाचा सन्मान आहे. असे चैतन्याच्या सर्वेसर्वा सुरेखा वाळके सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here