वेंगुर्ला प्रतिनिधी- भंडारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा होणारा गौरव हा त्यांनी घेतलेल्या परीश्रमाचे कौतुक आहे. आपल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी यापुढील शिक्षणांत यापेक्षाही परीश्रम घेत यश प्राप्त करावे. आपले व आपल्या समाजाचे नाव तालुक्यात जिल्ह्यात रोशन करावे यासाठी दिलेले प्रोत्साहन आहे. भविष्यात मोठमोठ्या हुद्द्यावर काम करावे किवा स्वतंत्र व्यावसाय करून इतरांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात. त्याचा समाजातील तरूणांनाही फायदा होईल या दृष्टीने हा गौरव आहे, असे प्रतिपादन भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ल्याचे अध्यक्ष अॅड.नारायण उर्फ श्याम गोडकर यांनी भंडारी समाजातील विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमांत केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-नारायण-वालावलकर-यांचे-नि/
येथील साई दरबार हॉलमध्ये भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्लातर्फे दहावी व बारावी परिक्षेत प्रत्येक शाळेतून प्रथम तीन क्रमांक पटकाविणा-या तालुक्यातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष रमण वायंगणकर व भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्लाचे अध्यक्ष अॅड. नारायण उर्फ श्याम गोडकर, भंडारी महासंघाचे जिल्हा सचिव विकास वैद्य, संचालक चंद्रकांत गडेकर, वृंदा कांबळी, डॉ. आनंद बांदेकर, सुरेश धुरी, दिपक कोचरेकर, प्रा.डॉ.जी.पी.धुरी, जयराम वायंगणकर, अॅड.प्रकाश बोवलेकर, मोहन मोबारकर, अंकिता बांदेकर, श्रेया मांजरेकर, गजानन गोलतकर, यशवंत फटनाईक आदी उपस्थित होते.
वृंदा कांबळी यांनी दहावी व बारावीनंतर करियरच्या संधी यावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. सौ. कांबळी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार तसेच कु. उत्कर्षा गोडकर हिने एल.एल.बी. परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल तसेच प्रा.डॉ.जी.पी.धुरी यांनी जे.जे.टी. विश्वविद्यालय, राजस्थान येथून पी.एच.डी.पदवी मिळविल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील भंडारी समाजतील दहावी व बारावी परीक्षेत शाळांमधून प्रथम तीन क्रमांकांत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय भेटवस्तू, प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमास अन्य उपस्थित मान्यवरांत मठ हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील जाधव, शिरोडा हायस्कूलचे शिक्षक आबा कांबळी, आंबा बागायतदार शिवराम आरोलकर यांचा समावेश होता.
प्रास्ताविक जयराम वायंगणकर यांनी तर सुत्रसंचालन व आभाराचे काम डॉ. आनंद बांदेकर यांनी पाहिले.
फोटोओळी – भंडारी ऐक्यवर्धक मंडळातर्फे विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.