महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी ठोस पावले
मुंबई : राज्यातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आदिशक्ती अभियान’ला राज्यभरातून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्यात एकूण ३५१ तालुका आणि २६ हजार ५९ ग्रामस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांचे प्रशिक्षण कार्य तातडीने पूर्ण करून अभियानाची अंमलबजावणी अधिक परिणामकारकपणे करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.https://sindhudurgsamachar.in/अपूर्ण-स्वप्नातून-साकारल/
‘आदिशक्ती अभियान आणि पुरस्कार योजना’ संदर्भात मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी विभागनिहाय प्रगतीचा आढावा घेतला. या वेळी विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, सहसचिव वि.रा. ठाकूर, सहआयुक्त राहूल मोरे, आणि अवर सचिव सुनील सरदार उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, एकात्मिक बालविकास विभागाचे आयुक्त कैलास पगारे, तसेच छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोकण, नागपूर आणि अमरावती विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.
मंत्री तटकरे म्हणाल्या की, ‘आदिशक्ती अभियान’ हे महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय सक्षमीकरणासाठी एक प्रभावी माध्यम ठरणार आहे. या अभियानाद्वारे महिला बचतगटांचे सशक्तीकरण, महिला सुरक्षा, न्यायप्रवेश, आरोग्य व पोषण जनजागृती, शिक्षण आणि व्यवसायिक उन्नती, नेतृत्व विकास तसेच सामाजिक सहभाग वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
या अभियानाच्या माध्यमातून महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती प्रत्येक गावातील महिलांपर्यंत पोहोचविणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरीय समित्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागीय आयुक्तांना दिले.
तसेच, ‘ग्रामसमृद्धी योजने’च्या धर्तीवर ग्रामसभांमध्ये ‘आदिशक्ती अभियान’चा प्रसार करण्यात यावा आणि योजनेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती पुस्तिका तयार करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.


