आमची लाडकी आई!

0
128

दैनिक सिंधुदुर्ग समाचार परिवाराच्या दुःखात आपण सर्वानी दिलेल्या प्रेमाच्या आपुलकीच्या धीराच्या शब्दांबद्दल धन्यवाद!

आज आमच्या लाडक्या आईवर लेख लिहायची वेळ माझ्यावर आली याच मला खूप वाईट वाटत. मी “माझी आई” अस जरी लिहिल असलं तरी बाबांच्या प्रत्येक विद्यार्थ्यांची ती आई होती. समाजसेवेचं वेड असलेल्या माझ्या वडिलांबरोबर माझी आई कळतं नकळत त्यांच्या समाजसेवेत कधी सामावून जायची ते तिलाही कळत नसे. बाबांचे अनेक विद्यार्थी आमच्या घरातच राहत असत. पण या गोष्टीमुळे ती कधीही चिडलेली,त्रासलेली आम्ही पहिली नाही. काहींचे तर वडीलच आपल्या मुलांना आई-बाबांवर सोपवून जायचे आणि हेच विद्यार्थी आमचे मामा होते आणि आजही आहेत.

अतिशय समाधनी आणि शांत वृत्तीची माझी आई घोणसरीच्या श्री.बाबाजीराव राणे या खोतांच्या खानदानी घरातील होती.तिची आई तरंदळे येथील सावकार सावंतांच्या घरची.आईचं माहेर खानदानी,सुसंस्कृत,सुखवस्तू होते. आईच्या वागण्या,बोलण्यातील आणि दिसण्यातील खानदानीपणा हा तिच्या सुसंस्कृत घरातून आला होता.तिचे वडील म्हणजे माझे आजोबा तर तिला जमिनीवर पायसुद्धा ठेऊ देत नसत.आणि नंतर आम्हालाही! मुलींनी शिकायला हवे,घरकाम वगैरे नंतर असतेच या विचारांचे माझे आजोबा होते. माझ्या आजोबांनी शिक्षणाला खूप महत्व दिले होते.अश्या अत्यंत श्रीमंत घरातील माझी आई लग्नानंतर बाबांच्या घरात आली तेव्हा जमीन अस्मानाचा फरक होता. पण आजोबांनी बाबांच्या शिक्षणाला महत्व दिल होत. तिनेही सासरच्या घरातील सर्वांशी जुळून घेतलं. श्रीमंतीचा तिने काधीही गर्व,दिखावा कुणासमोरही केला नाही.

संसाराच्या अगदी पहिल्या वर्षांपासूनच बाबांनीं आमच्या मोठ्या काकांच्या मुलांना आपल्याकडे शिकण्यास ठेवले.आमची आजी अगदी शेवटपर्यंत आमच्याकडे होती. माझ्या छोट्या काकांचा सांभाळ तर आईने आपल्या मुलाप्रमाणे केला.आजही आमच्या गढी-ताम्हाणे गावात आईची एक सुसंस्कृत, मनमिळाऊ आणि सालस सून अशीच ओळख आहे.आजच्या जगात असणारा हा अतिशय दुर्मिळ गुण !

आपल्या सुगरण आईचा वारसा घेऊन आलेली माझी आई एक सुगरण तर होतीच पण अन्नपूर्णाही होती.आमच्या घरात अगदी वेळी- अवेळी कुणीही आले तरी तिच्या स्वयंपाकघरातले अन्न कधीही कमी पडत नव्हते.स्वयंपाकासाठी आईने कधीही बाई ठेवली नाही. स्वतःच्या हातांनी स्वयंपाकात प्रेम ओतून ती जेवण बनवत असे. तिच्या हातच्या चाखलेल्या पदार्थांची चव सांगणारे अनेक किस्से आज तिच्या जाण्याचे सांत्वन करणारे फोन आले तेव्हा पुन्हा एकायला मिळाले.आमच्या बाबांचे समाजकार्यामुळे उठणे-बसने राजकीय वर्तुळात असल्याने आमच्या घरी बॅरिस्टर अंतुले,भाईसाहेब सावंत,सरन्यायाधीश चंद्रचूड यांसारख्या अनेक राजकारण्यांबरोबरच मंगेश पडगावकर,कर्णिक,रणजित देसाई यांसारखे अनेक साहित्यिकांचेही येणे-जाणे असायचे.या प्रत्येकाला आईच्या हातचे वेगवेगळे पदार्थ आवडायचे.अगदी हक्काने प्रत्येकजण आईला सांगायचे कि मी येतो आहे आणि मला तुमच्या हातचा अमका पदार्थ खायचा आहे. आईला प्रत्येकाच्या आवडी -निवडी अगदी आजपर्यंत आठवणीत होत्या.

तिच्या या गुणामुळेच अनेक वेळा बाबा आपल्या समाजकार्यात अगदी निर्धास्तपणे भाग घेत असत. बाबांच्या बरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून जीवनातल्या प्रत्येक सुख-दुःखाच्या वेळी तिने कधीही आपला तोल ढळू दिला नाही. त्यामुळे आमच्या घरात आम्ही आई-वडिलांचे भांडण कधीही ऐकले नाही.

बाबांवर आईचे खूप प्रेम होते.तेवढेच बाबांचेही तिच्यावर होते.बाबांनीही आईला काही कमी पडू दिले नाही.बाबा आणि आमच्यासाठी आई मात्र सकाळपासून रात्रीपर्यंत धडपडत असायची.आमच्या घरात नेहमी सर्व काम करायला माणसं होती पण ती स्वतः प्रत्येक गोष्ट बघत असे.

आई दिसायला खूप गोरीपान,नाजूक,आणि बाहुलीसारखी छोटीशी होती.ती जेवणही खूपच कमी घ्यायची.त्यामुळे बाबा नेहमी आपल्या खाण्यातील अर्धा भाग तिला द्यायचे.आम्हालाही बाबा नेहमी आईला जपा, तिची काळजी घ्या असे सांगायचे.आईच्या चेहऱ्यावरच्या प्रेमळ हसतमुख भावानेच लोक तिला खूप प्रेमळ,साधी आहे असं म्हणत.आम्हाला कोणतीही शिस्त सांगताना आईने मारून,धमकावून सांगितले नाही आणि आम्हीही तिने कधी काही सांगितले तर ते एकूण त्याप्रमाणे वागत असू.

आम्ही मुलींनी तर आईकडूनच संसार कसा करायचा हे शिकून घेतलं. केव्हाही कुठलाही प्रसंग आला तरी हसतमुख राहायचे हे आईनेच आम्हाला शिकवले.बाबांना आमच्याबद्दल नेहमी वाटायचं कि आम्ही धडाडीने उभं राहावं, खूप चांगल करिअर करावे. बाबा नेहमी आमच्याकडे आले कि म्हणत तुम्ही माझ्यासारख काही केलं नाहीत पण आईसारखा उत्तम संसार करणे मात्र शिकला आहात.

आई -बाबांनी कधीही आमच्यावर हात उगारला नाही, का कधी ओरडले नाहीत, ना कधीही तुम्ही हे करायलाच हवा अशी सक्ती केली. आई या शब्दातच तीच्या मायेची उब, अपार प्रेम, आमच्या बद्दलची काळजी असायची. अगदी उडत्या फुलपाखरासारखं आमचं जीवन आनंदी आणि सुखी होतं.

आई आणि बाबा यांच्याशिवाय आमच्या जीवनात महत्वाचं काहीच नव्हतं. बाबा गेले तेव्हा खूप दुःख झाल पण सोबत आई होती आणि तिच्यासोबत दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला. त्या दुःखातून आजही आम्ही बाहेर आलेलो नसतानाच आईही अचानक निघून गेली आणि आम्ही कोलमडून पडलो, पोरके झालो. आता आयुष्यात काहीच उरल नाही असं वाटत. ती नाही तर आता काय करावे काही कळत नाही. कशाचाच अर्थ वाटत नाही.

अनेकांच्या आयुष्याचे शिल्पकार ठरलेल्या असे आई-बाबा आम्हाला लाभले हे आमचं भाग्य आणि खूप अभिमान आहे. येणाऱ्या प्रत्येक जन्मी हेच आईबाबा आम्हाला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • उज्वला,शमा,रूपा,विक्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here