कोकणातील प्रथितयश साहित्यिक व शिक्षक बाबू घाडीगांवकर यांच्या ‘वणवा’या मराठी लघुकथासंग्रहाचे प्रकाशन

0
139
' वणवा ' या मराठी लघुकथासंग्रहाच्या प्रकाशन

प्राथमिक शिक्षकाचे पुस्तक प्रकाशित होणे हे अभिमानास्पद!आचरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व सेवानिवृत्त शिक्षक बाबाजी भिसळे

आचरा- प्राथमिक शिक्षक हा मूळातच साहित्यिक असतो. मात्र अशा प्राथमिक शिक्षकाचे साहित्यविषयक पुस्तक प्रकाशित होणे ही समस्त शिक्षणप्रेमींसाठी अभिमानास्पद बाब आहे असे प्रतिपादन आचरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व सेवानिवृत्त शिक्षक बाबाजी भिसळे यांनी कोकणातील प्रथितयश साहित्यिक व शिक्षक बाबू घाडीगांवकर यांच्या ‘ वणवा ‘ या मराठी लघुकथासंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी केले.

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा- मालवण, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, शाखा- मालवण , श्री दत्तमंदिर सेवा मंडळ, चिंदर गांवठणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणचे भाग्यविधाते बॅ. नाथ पै यांच्या एकावन्नव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमात बॅ. नाथ पै यांना अक्षरस्वरूप आदरांजली म्हणून कोकणातील प्रथितयश साहित्यिक तथा शिक्षक बाबू घाडीगांवकर लिखीत ‘ वणवा ‘ या मराठी लघुकथासंग्रहाचे समारंभपूर्वक प्रकाशन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा- मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर आचरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, शाखा- मालवणचे सचिव पांडुरंग कोचरेकर, चिंदर गावच्या सरपंच राजश्री कोदे, सेवानिवृत्त अधिकारी सुरेंद्र सकपाळ, जनता विद्या मंदिर, त्रिंबकचे मुख्याध्यापक प्रविण घाडीगांवकर, ज्येष्ठ कवी, गझलकार तथा शिक्षक एकनाथ गायकवाड, श्री दत्तमंदिर देवस्थान अध्यक्ष स्मीता पाटील, चिंदर ग्रामपंचायत सदस्य दूर्वा पडवळ, सेवानिवृत्त शिक्षिका अर्चना बागवे, मालवणी कवी भूषण दत्तदास, पत्रका, राजू परब आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात बॅ. नाथ पै यांच्या जीवनचरित्रावर सुरेश ठाकूर यांनी सविस्तर विवेचन केले व बॅ. नाथ पै यांच्या जीवनातील काही अविस्मरणीय प्रसंग कथन केले.

याच कार्यक्रमात बॅ. नाथ पै यांना अक्षरस्वरुप आदरांजली म्हणून कोकण मराठी साहित्यज परिषद शाखा- मालवणचे सदस्य असलेल्या बाबू घाडीगांवकर यांच्या ‘ वणवा ‘ या मराठी कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. एकूण वीस लघुकथांचा सामावेश असलेला हा कथासंग्रहात कोकणातील समाजजीवन व लोकजीवन अधोरेखित करण्यात आले आहे. या कथासंग्रहातील प्रत्येक कथेत कोकणातील लोकजीवनाचे प्रतिबिंब दिसते असे विवेचनही या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेल्या बाबाजी भिसळे यांनी केले. याप्रसंगी एकनाथ गायकवाड व प्रविण घाडीगांवकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र सकपाळ यांनी केले तर एकनाथ गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here