पुणे- देशावर कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरियंटचे संकट आलेले असताना, कोविड लसीकरणाला गती देण्याची गरज आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. उलट केंद्र सरकारने कोविड लसींसाठी नव्याने ऑर्डरच दिलेली नाही.त्यामुळे पुढील आठवड्यापासून ‘कोविशिल्ड’ लसीचे उत्पादन 50 टक्क्यांनी कमी करणार असल्याची माहिती पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी दिली.
मोदी सरकारच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले, की “केंद्र सरकार लसींची ऑर्डर देत नसले, तरी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा संभाव्य धोका लक्षात घेता आम्ही कुठलीही जोखीम घेणार नाही.. जवळपास 2 ते 3 कोटी डोसचा साठा करून ठेवणार आहोत. सरकारने ऑर्डर दिल्यास मोठ्या प्रमाणात लसींचे उत्पादन करू शकू.”
देशाला कधीही मोठ्या प्रमाणात डोसची गरज भासू शकते. अशा वेळी अतिरिक्त लसींचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने आम्ही तयार राहणार आहोत. आशा आहे, तशी परिस्थिती येणार नाही. परंतु, आम्ही सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लसी पुरवू शकत नसल्याची वेळ आणायची नसल्याचे पूनावाला यांनी सांगितले.’ओमायक्रोन’ विषाणूवरही ‘कोविशिल्ड’ लस प्रभावी असल्याचा दावा करताना पूनावाला म्हणाले, की ‘ओमायक्रोन’ व्हेरिएंटचा मुकाबला करताना, ही लस काम करणार नाही, असे म्हणण्याचे कोणतेही कारण नाही. ओमायक्रोनच्या धोक्यापासून खूप चांगले संरक्षण देण्याची क्षमता लसीच्या दोन डोसमध्ये आहे.
ते म्हणाले, की “आम्ही आफ्रिकन देशांच्या नेत्यांच्या संपर्कात आहोत. ‘कोवॅक्स’ मोहिमेच्या माध्यमातून गरीब देशांना लसींचा पुरवठा करण्यासाठी 40 ते 50 कोटी डोसच्या ऑर्डर्सचा आढावा घेतला आहे. अमेरिकेने कोरोना प्रतिबंधक लसीच्या डोसचे मोठ्या प्रमाणात दान केले आहेत. आम्ही तशा तयारीत आहोत. तसेच लसींच्या निर्यातीबाबत केंद्र सरकारच्या निर्देशांची प्रतीक्षा करतोय..!”