खासगी हॉस्पिटलमधील आक्षेपार्ह बिलांची तपासणी करण्यासाठी समिती गठीत करा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

0
111

कोरोना संसर्ग काळात प्रशासनाच्या आवाहनानंतर खाजगी हॉस्पिटलने केलेले सहकार्य अनमोल आहे. मात्र याच काळात काही असामाजिक तत्वांनी संधीचा फायदा तर घेतला नाही ना..? याची तपासणी करा. खासगी हॉस्पिटलमधील तक्रार, आक्षेप असणाऱ्या बिलांचे परीक्षण करण्यासाठी तटस्थ पद्धतीने काम करणाऱ्या वैद्यकीय समितीचे गठन करा. सत्य जनतेपुढे येऊ द्या, असे निर्देश ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज महापालिका आयुक्तांना दिले.

गाव पातळीवर लसीकरणासंदर्भातील प्रबोधन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांमध्ये गावांची विभागणी केली.लस मिळाल्याबरोबर वितरण सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.तिसऱ्या लाटेसाठी केलेल्या उपाययोजनेचा तपशील पालकमंत्र्यांनी मागितला. ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणाकडे अधिक लक्ष दिले जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तिसऱ्या लाटेचे उग्ररूप ग्रामीण भागात राहील, अशी शक्यता आहे.

त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व आरोग्य यंत्रणा बळकट करणे सुरू असून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, औषध पुरवठा, आवश्यक यंत्र पुरवठा आणि बेड वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. यासोबतच ग्रामीण भागात उपलब्ध असणाऱ्या खाजगी डॉक्टरांकडून रुग्णसेवा व्हावी, यासाठी त्यांचे प्रशिक्षण व त्यांच्याशी समन्वय ठेवला जात असल्याचे सांगितले.ग्रामीण भागात आरोग्य सुविधा नसल्याने नागरिकांची नाराजी असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी अस्तित्वात असणाऱ्या आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरणावर भर देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.खाजगी लॅब, आरटीपीसीआर, सीबीसी, सीआरपी,डी-डायमर, एलएफटी, केएफटी, एचआरसीटी तपासणीचे वेगवेगळे दर आकारत आहेत. याची चौकशी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.खासगी हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाच्या आरोग्याची माहिती दररोज मोबाईलवर देणारी यंत्रणा विकसित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

कडक निर्बंधांच्या काळात विनाकारण बदनामी करणाऱ्या खोट्या बातम्या समाज माध्यमांवर पसरविणाऱ्याबाबत सायबर सेलकडे तक्रार नोंदवा व कारवाई करण्याबाबतचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here