नवी दिल्ली- देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालं होतं. या हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीचा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार यांत्रिक बिघाड, घातपात किंवा दुर्लक्ष अशा शक्यता नसल्याचं स्पष्ट झालं आहे. खराब हमामानामुळं हा अपघात घडल्याचं चौकशीत समोर आलं आहे. 8 डिसेंबर 2021 रोजी तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये बिपिन रावत यांच्या Mi-17 V5 या हलिकॉप्टरला अपघात झाला होता. त्या अपघातात बिपीन राव यांच्यासह एकूण 14 जणांचा मृत्यू झाला होता.या अपघाताच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीनं प्राथमिक अहवाल सादर केला असून, त्यात मृत्यूचं कारण देण्यात आलं आहे.
तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांची समिती
बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताच्या चौकशीसाठी ट्राय सर्व्हिसेस कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले होते. त्यात तिन्ही सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.या चौकशी समितीच्या पथकानं फ्लाईट डाटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हाइस रेकॉर्डर यांच्यातील माहितीचा अभ्यास केला. त्याचबरोबर घटनेच्या सर्व साक्षीदारांचे जबाबही नोंदवले.
हवामान बदलामुळं अंदाज चुकला
हवानात अचानक झालेल्या बदलामुळं हेलिकॉप्टर ढगांमध्ये शिरलं होतं. त्यामुळ वैमानिकाचा अवकाशीय म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज चुकला आणि हेलिकॉप्टर कोसळलं, असं या अहवालात म्हटलं आहे.