हवामान विभागाने अरबी समुद्रात दक्षिण पूर्व भागात तौत्के’ नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले असल्याचे वर्तविले होते. चक्रीवादळ तयार होत असतानाच लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक किनारपट्टी आणि तमिळनाडूच्या काही भागांत अतिवृष्टी होत आहे. १८ मे रोजी सकाळी चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीपर्यंत जाणार असल्याने या भागांत ताशी ११५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून, अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
‘तौत्के’ नावाच्या चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्रालाही बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याप्रमाणे दक्षिण कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि मध्य-पश्चिाम महाराष्ट्रात १५ आणि १६ मे रोजी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने पुढे सरकताना १५ ते १७ मे दरम्यान ते महाराष्ट्र किनारपट्टीला समांतर जाणार आहे. त्यामुळे कोकणात प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी आणि तीव्र वादळ असणार आहे. १५ आणि १६ मे रोजी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथेही सोसाट्याचा वारा आणि पाऊस असेल.
या भागातील लोकांना सावधतेचा इशारा दिला आहे याच कालावधीत मुख्यत: पश्चिाम महाराष्ट्रातील घाटक्षेत्रात कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाटक्षेत्रातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथेही सोसाट्याचा वारा आणि पाऊस होणार आहे असेही सांगितले आहे.