राज्यातील परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी २१ जूनपासून आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन १०० टक्के पदभरती, पदोन्नती, नर्सिंग अलाऊन्स अशा विविध मागण्यांसाठी पुकारले होते. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या मागण्या तत्वत: मान्य करण्यात आल्या आहेत. पुढील १५ दिवसांत या मागण्यांची पूर्तता करम्यात येईल, असं आश्वासन परिचारिकांना देण्यात आले आहे.
मुंबईतील जे.जे रुग्णालयातील ७०० परिचारिकांसह २४ जिल्ह्यांतील परिचारिकांचा यात समावेश होता. 100 टक्के पदभरती, पदोन्नती, नर्सिंग अलाऊन्स, जोखीम भत्ता, पदनामामध्ये बदल, विलगीकरण रजा अशा प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. सुरुवातीला दोन तास कामबंद संप करणाऱ्या या आंदोलनाने आज तीव्ररूप धारण केले होते. मागण्या मान्य न झाल्यास 25 तारखेपासून बेमुदत संप पुकारण्यात येईल असा इशारा परिचारिका संघटनांनी दिला होता. त्यानुसार आज भरपावसात परिचारिकांनी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनात जे.जे. रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जीटी रुग्णालयातील परिचारिका आणि ब्रदर यांचा सहभाग होता. या आंदोलनाला जेजे चतुर्थ श्रेणी मध्यवर्ती संघटना आणि जे.जे. हॉस्पिटल कृती समितीने पाठिंबा दिला होता. गेले चार दिवस झाले हे आंदोलन सुरु असल्यामुळे. या आंदोलनामुळे शासकिय रुग्णालयातील बऱ्याच शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. केवळ अत्यावश्यक शस्त्रक्रिया सोडता बाकी शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या गेल्या होत्या.
संपामुळे सामान्य रुग्णांचे मोठे हाल होत असल्यामुळे सरकारने या आंदोलनाची दखल घेत परिचारिकांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या सोबत झालेल्या बैठकीत परीचारिकांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून पुढील 15 दिवसांत मागण्यांची पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.