कोल्हापूर: कोल्हापूर येथे पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन दिनांक १४, १५ व १६ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आले आहे. हे साहित्य संमेलन विवेकानंद महाविद्यालयाने आयोजीत केले असल्याचे संस्थेचे सचिव श्रीमंतराव शिसोदे पाटील यांनी सांगितले. या वर्षी औरंगाबादेतील विवेकानंद महाविद्यालय या संस्थेचे स्थापनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने त्यांनी या संमेलनाचे सह आयोजक बनल्याचे सांगितले आहे.
संमेलनाचे अध्यक्ष मदन महाराज गोसावी हे दूरदृश्यप्रणालीद्वारे या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी सांगितले की, संत ज्ञानेश्वरांचा ७२५ वा समाधी सोहळा व संत नामदेवांची ७५१ वी जयंती यांचे औचित्य साधून अखिल विश्वातील सर्वधर्मसंप्रदायाचे अभ्यासक व उपासकांचे विचार या साहित्य संमेलनात ऐकण्यास मिळणार आहेत. या पत्रकार परिषदेसाठी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रभाकर मोरे, भाषा साहित्य संशोधन परिषदेचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव जिगे, ‘तिफण’चे संपादक डॉ. शिवाजी हुसे, डॉ. ऋषीबाबा शिंदे, डॉ. अशोक देशमाने, डॉ. प्रमोद कुमावत, प्राचार्य डॉ. रामदास वनारे आदींची उपस्थिती होती.