प्रजासत्ताक दिन सोहळ्यात महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारलेली नाही – सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे स्पष्टीकरण

0
144

मुंबई : प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाला परवानगी नाकारलेली नसल्याचे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे होत असलेल्या संचलनात महाराष्ट्र राज्याने सादर केलेल्या विविध विषयांमधून या वर्षी ‘महाराष्ट्राची जैवविविधता व मानके‘ या विषयाची केंद्र शासनाकडून निवड करण्यात आली आहे. याबाबत वेळोवेळी संरक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार बैठका आयोजित होऊन महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची एकूण 12 राज्यांसमवेत निवड अंतिम करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत राष्ट्रीय रंगशाळा, नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्रालयाच्या देखरेखीखाली चित्ररथाची बांधणी सुरु असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारल्याबाबत कोणतीही सूचना संरक्षण मंत्रालयाकडून प्राप्त झालेली नाही. असे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली होती. सुरक्षेचे कारण देत संरक्षण मंत्रालयाने परवानगी नाकारल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.

महाराष्ट्राने २०१५ मध्ये ‘पंढरीची वारी’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता. तर २०१८ मध्ये ‘शिवराज्याभिषेक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता. या दोन्ही चित्ररथांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. यापूर्वी १९८० मध्येही शिवराज्याभिषेक या विषयावरील चित्ररथाला प्रथम पुरस्कार मिळाला होता. १९८३ साली ‘बैलपोळा’ या विषयावरील चित्ररथ सर्वोत्तम ठरला होता. त्यानंतर १९९३ ते १९९५ अशी सलग तीन वर्षे अनुक्रमे गणेशोत्सव, शताब्दी, हापूस आंबे आणि बापू स्मृती या चित्ररथांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here