सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यामध्ये बोलत असताना शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपला टोला लगावला आहे. ते म्हणाले की, ‘अजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. मला देखील ईडीची नोटीस आली होती. ज्या बँकेचे मी सदस्य नाही, त्या बँकेचे मी कधीही कर्ज आयुष्यात घेतले नाही. त्यावर मला नोटीस पाठवण्यात आली होती. मला ईडी पाठवली पण लोकांनी भाजपला वेडे ठरवले. सत्तेचा गैरवापर आजचे राजकर्ते करत आहेत. त्यांना जनता धडा शिकवेल’ असेही शरद पवार म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित ठिकाणांवर गुरुवारी आयकर विभागाने छापेमारी केली होती. त्यांच्या साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर छापेमारी करण्यात आली. बुधवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. यानंतर लगेच ही कारवाई करण्यात आली. अजित पवार यांच्यांशी संबंधीत सर्वच ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. पवारांशी संबंधीत कारखान्यांच्या संचालकांच्या घरी देखील छापेमारी करण्यात आली होती.


