भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवत भारतीय चाहत्यांच्या हृदयात अभिमानाची लाट उसळवली आहे. मात्र या यशामागे केवळ खेळाडूंचे नव्हे, तर त्यांना घडवणाऱ्या मार्गदर्शकाचेही मोलाचे योगदान आहे — प्रशिक्षक अमोल मुजुमदार. https://sindhudurgsamachar.in/
मुंबईच्या रणजी परंपरेत झळकणारे अमोल मुजुमदार हे एकेकाळी भारतीय संघात खेळण्याचं स्वप्न पाहत होते. परंतु नियतीने तो अध्याय लिहिला नाही. तरीसुद्धा त्यांनी आपलं पुस्तक बंद केलं नाही — उलट क्रिकेटच्या प्रत्येक पानाला त्यांनी अनुभव, समर्पण आणि परिश्रमाची नवीन शिदोरी दिली.
खेळाडू म्हणून त्यांनी असंख्य धावा केल्या, परंतु त्यांच्या खरी “इनिंग” मैदानावर नव्हे, तर प्रशिक्षणाच्या मातीमध्ये उमलली. 2023 मध्ये जेव्हा त्यांनी भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारले, तेव्हा त्यांनी मोठा गाजावाजा केला नाही. त्यांनी आणली एक शांत क्रांती — शंकेच्या जागी विश्वास, दबावाच्या क्षणी धैर्य आणि संघभावनेतून उमललेला आत्मविश्वास.
आज जेव्हा वर्ल्ड कपचा चषक भारतीय आकाशाखाली झळकत आहे, तेव्हा हा विजय केवळ खेळाडूंचाच नाही, तर त्या मार्गदर्शकाचाही आहे, ज्यांनी नकाशा आखला, चाकं दुरुस्त केली आणि प्रत्येक खेळाडूला म्हणाले — “तू करू शकतेस.”
अमोल मुजुमदार यांचं वैयक्तिक स्वप्न अपूर्ण राहिलं असलं, तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघाने जे स्वप्न साकार केलं आहे, ते संपूर्ण राष्ट्राचं वास्तव बनलं आहे.

