प्रतिनिधी -दोडामार्ग – सुमित दळवी
दोडामार्ग -डोंगर-दर्यांनी व्यापलेल्या, सोयीसुविधांचा अभाव असलेल्या सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले या तालुक्यांमध्ये अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून आधार अभियान राबविण्यात येणार आहे. बुधवार, दि. ११ मे २०२२ रोजी दोडामार्ग येथून या अभियानास प्रारंभ होणार आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात, गरजूंना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती अर्चना फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आधार अभियान तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यांमध्ये अर्चना फाउंडेशनने मदत केंद्रे सुरु केली आहेत. पहिला टप्पा दि. ११ ते १५ मे दोडामार्ग केंद्र, दुसरा टप्पा दि. १६ ते २२ मे वेंगुर्ले केंद्र आणि तिसरा टप्पा दि. २३ ते ३१ मे सावंतवाडी केंद्र, अशा प्रकारे आधार अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अर्चना घारे यांनी दिली.
अर्चना घारे म्हणाल्या की, कमी लोकसंख्येची छोटी-छोटी गावं डोंगरांच्या कुशीत विसावलेली आहेत. डोंगरी भाग असल्यामुळं या भागात उत्पन्नाची साधनं देखील कमी आहेत. उद्योग-व्यवसाय कमी असल्यामुळे प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल, याची शाश्वती नाही. अशावेळी नागरिकांसाठी शासकीय योजना लाभदायी ठरतात. केंद्र आणि राज्य शासनाने विविध जनकल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत, ज्याचा लाभ घेतला तर जगणं सुसह्य होऊ शकतं. परंतु अनेकांना शासकीय योजनांची माहिती नसते. लोकांना शासकीय योजनांची माहिती मिळावी, त्यांना योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी अर्चना फाउंडेशनने हा लोककल्याणकारी उपक्रम हाती घेतला आहे.
समाजातील निराधार, वृध्द व्यक्ती, अंध, अपंग, निराधार विधवा, परित्यक्ता, देवदासी महिला, अनाथ बालके इत्यादींचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी शासकीय योजना फायदेशीर ठरत आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी शासन विविध विभागांमार्फत योजना राबवत असते. जसे व्यावसायिक विभाग, शैक्षणिक,आरोग्य, सामाजिक विकास, महिला सक्षमीकरण व कौशल्य विकास, बाल विकास, सामूहिक विकास, कृषी विकास, ग्रामीण विकास, वैयक्तिक लाभ, भूमी अभिलेख, पशुसंवर्धन, क्रीडा विषयक व इतरही अनेक लोककल्याणकारी योजना आखल्या गेल्या आहेत. परंतु सर्वसाधारणपणे असे लक्षात येते की या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत.
अर्चना फाउंडेशनने एक माहितीपत्रक तयार केले आहे, ज्यामध्ये आठ महत्त्वाच्या योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, आयुष्यमान भारत योजना, ई-श्रम कार्ड योजना, सुकन्या समृद्धी योजना, पंतप्रधान किसान योजना केवायसी, तसेच नवीन आधारकार्ड काढणे व दुरुस्ती करणे, नवीन मतदान ओळखपत्र काढणे व दुरुस्ती करणे, नवीन पॅनकार्ड काढणे व दुरुस्ती करणे अशा योजनांचा समावेश आहे. ही पुस्तिका घरोघरी पोहोचविण्यात येणार आहे. नागरिकांनी अर्चना फाउंडेशनने सुरू केलेल्या आपल्या जवळील मदत केंद्रावर जाऊन योजनांचा माहिती व लाभ घ्यावा, असे आवाहन अर्चना घारे यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेस अर्चना फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

