अलिबागच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह — नागरिकांचा प्रशासनाला सवाल, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी कुठे?

0
20

अलिबाग : शहरातील वाढती अस्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आज दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर नागरिकांनी सोशल मीडियावरून प्रशासनाला सरळ सवाल केला आहे — सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आजपर्यंत कोणती ठोस अंमलबजावणी केली गेली आहे?

नागरिकांनी मांडलेले प्रश्न स्पष्ट आणि तितकेच गंभीर आहेत.
त्यांनी प्रशासनासमोर चार महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत —

1️⃣ भटके कुत्रे आणि ऊनाड गुरेढोरे नियंत्रण:
शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर भटके कुत्रे व ऊनाड गुरेढोरे फिरताना दिसतात. या संदर्भात लसीकरण, निर्बिजिकरण आणि त्यांच्यावर कारवाईचे नियोजन अद्याप प्रभावीपणे होत नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.

2️⃣ फ्लेक्स बॅनर्स आणि जाहिरातींवर नियमभंग:
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अवैध फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि जाहिरातींवर कारवाई झाली नसल्याचा आरोप आहे. शहरातील अनेक ठिकाणी हे बॅनर्स दृश्यदूषण निर्माण करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

3️⃣ फेरीवालामुक्त आणि पार्किंगमुक्त रस्त्यांचे आश्वासन हवेत:
डीपीनुसार रस्ते, फुटपाथ आणि पार्किंगची योजना असूनही रस्त्यांवरील फेरीवाले, अनधिकृत पार्किंग, तसेच जुन्या विद्युत खांबांमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “६० वर्षांपूर्वीच्या या पोल्स आणि अडथळे कधी दूर करून रस्ते वापरात आणले जाणार?”

4️⃣ महत्त्वाच्या प्रकल्पांवरील ठप्प स्थिती:
भाजीमार्केट, हॉकर्स मार्केट, डंपिंग ग्राउंड, भुयारी गटार प्रकल्प, वाढीव पाणीपुरवठा योजना, तसेच बीचवरील बंधाऱ्यावर असलेले पोल लाईट्स हे अनेक महिने बंद आहेत.
अनेक वेळा तक्रारी, तसेच सोशल मीडियावर पोस्ट करूनही यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

तसेच आरसीसी गटाराखाली विद्युत केबल्स टाकताना सुरक्षित डीपी बॉक्स न बांधल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नियमित गटार सफाई, डास व उंदीर निर्मूलन, तसेच जंतुनाशक फवारणी सातत्याने व्हावी, अशी मागणी केली जात आहे.

याशिवाय नागरिकांनी राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी, पर्यटक केंद्रांवरील सोयीसुविधा, नाट्यगृह, आरोग्यसेवा, शिक्षण, क्रीडांगण यांसारख्या आवश्यक प्रकल्पांवरील कामगिरीविषयीही प्रश्न उपस्थित केले आहेत.

🔹 “प्रशासनाने कृती आराखडा तयार करून त्याची कालमर्यादा जाहीर करावी,” अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शहरातील वाढत्या पर्यटकसंख्येच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, वाहतूक, पाणीपुरवठा आणि पर्यावरण या सर्वच आघाड्यांवर सुधारणा करण्याची तातडीची गरज आहे. नागरिकांच्या या सवालांना आता प्रशासन काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here