अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत शेकाप-काँग्रेस आघाडीने विजयाचा पहिला गुलाल उधळला आहे. प्रभाग क्रमांक २ ‘ब’ मधून शेकापचे उमेदवार व माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक हे नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीला पहिला धक्का बसला आहे. प्रशांत नाईक यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार संतोष साळुंखे यांनी नामांकन दाखल केले होते.
मात्र गुरुवारी (दि. २०) त्यांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले. त्यामुळे या प्रभागात शेकापचे प्रशांत नाईक यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. या विजयाच्या आनंदात शेकाप कार्यकर्त्यांनी शेतकरी भवन येथे जल्लोष साजरा करत प्रशांत नाईक यांचे हार्दिक अभिनंदन केले.
अलिबाग नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. शेकाप-काँग्रेस आघाडी आणि भाजप-शिवसेना (शिंदे गट) युती यांच्यात मुख्य लढत रंगणार आहे. अशा पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ ‘ब’ मधील बिनविरोध विजयाने आघाडीच्या उमेदवारांनी उत्साहाने प्रचाराला सुरुवात केली आहे.
प्रशांत नाईक यांच्या विजयाच्या निमित्ताने आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अक्षया नाईक, नगरसेवकपदाच्या उमेदवार ॲड. मानसी म्हात्रे, तसेच शेकापचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन केले.

