जिल्हा सामान्य रुग्णालयात आज सकाळी अचानक लागलेली आग ही अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी घटना असून या आगीमुळे 11 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशा शब्दात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दुःख व्यक्त केले.श्री. थोरात यांनी दुर्घटनाग्रस्त भागातील परिस्थितीची माहिती जाणून घेतली आणि या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली. या दुर्घटनेतील सहा रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले आहे. शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना घडल्यामुळे येथे आगीचा धूर मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला, या धुरामुळे गुदमरून 11रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे, त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. या दुर्घटनेच्या बचावकार्यात अग्निशमन दलाच्या आणि सामान्य रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी, आणि नातेवाईकांनी अति तत्परतेने मदतकार्य सुरू करून येथील रुग्णांना बाहेर काढून दुसऱ्या जागी स्थलांतरित केले. तत्पूर्वी दुपारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही रुग्णालयाला भेट देऊन दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करून, तात्काळ मदत कार्यासाठी रुग्णालय प्रशासनाला सूचना दिल्यात.