नवी दिल्ली- रेल्वे विभागाने कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्वांनुसार रेल्वे प्रवासादरम्यान मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. रेल्वे मंडळाचे कार्यकारी संचालक नीरज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व झोनच्या मुख्य व्यवस्थापकांना यासंबंधी पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.
मास्क न घालणाऱ्याना आणि कोरोना नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालय तसेच आरोग्य मंत्रालयाने कोरोना संदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मास्क न घालणाऱ्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांनाही मास्क सक्ती करण्यात आली आहे. कोरोना रूग्णसंख्या रोडावताच रेल्वेने इतर निर्बंधांसह मास्क सक्तीही हटवली होती. परंतु, आता कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता रेल्वे पुन्हा निर्बंध घालण्याच्या मनस्थितीत असल्याचे अधोरेखित होत आहे.