आयटीआयमधील मुलींना मिळणार नाविन्यपूर्ण कौशल्य प्रशिक्षण

0
79

राज्य शासनाचा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग आणि यूएन वुमेन यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) मुलींसाठी फ्लाइट प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत आयटीआयमधील मुलींना कोडींग तसेच इतर सॉफ्ट स्किल्स शिकविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचा नुकताच ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, यूएन वुमनच्या वरिष्ठ अधिकारी कांता सिंह, कौशल्य विकास विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, युएन वुमेनच्या रुतुजा पानगांवकर, श्रीमती सुजान आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी फ्लाईट कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामुळे आयटीआयकडे मुलींचा ओढा वाढेल व त्यामाध्यमातून त्यांना कौशल्य विकास तसेच रोजगार, स्वयंरोजगाराची संधी मिळेल, असे त्यांनी सांगितले.

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यावेळी म्हणाल्या की, महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये मुलींचे प्रवेश, मुलींचा ओढा वाढविण्यासाठी विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या सर्व प्रयत्नांमध्ये  महिलांना प्रोत्साहन देणारे तसेच त्यांच्या यशाच्या वाटेतील अडथळ्यांवर मात करण्याइतपत सक्षमीकरण साध्य करणे  महत्त्वाचे आहे. व्यावसायिक क्षेत्रामध्ये तसेच वरिष्ठ नेतृत्व पदांवर महिलांचे अधिक चांगले प्रतिनिधित्व सुनिश्चित केले पाहिजे. व्यावसायिक शिक्षणातील महिलांच्या  प्रगतीपथावरील अडथळे दूर करून महिलांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने  फ्लाईट कार्यक्रम एक प्रभावी पाऊल ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दादर येथील महिला आयटीआयमधील विद्यार्थिनी आरती चंद्रनारायण म्हणाली की, FLIGHT कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थिनीला रोजगाराची संधी मिळेल.  आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलींनी पुढे यावे असे आवाहन तिने केले.

फ्लाइट कार्यक्रमामध्ये राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), पॉलिटेक्निक आणि महाविद्यालये सहभागी होणार आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग, यूएन वुमेन, त्यांचे समन्वयक व त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या इतर संस्था यांचा संयुक्त सहभाग फ्लाइट कार्यक्रमात असणार आहे. स्त्री- पुरुष समानता  आणि महिला सक्षमीकरणासाठी, विशेषतः कौशल्यपूर्ण शिक्षण, रोजगार आणि उद्योजकता या विषयाशी निगडीत क्षेत्रांमध्ये यंत्रणा मजबूत करण्यासाठी कोशल्य विकास विभाग आणि यूएन वुमेन यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार झाला आहे. त्याअंतर्गत फ्लाइट प्रकल्प राबविण्यात येणार आहे.  फ्लाईट  कार्यक्रमाला PROSUS गटाकडून निधी  उपलब्ध करून दिला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी PRDAAN आणि B-ABLE हे सहभाग देणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here