केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत योजने’त मोठा बदल करण्यात आला आहे. या आरोग्य लाभ पॅकेजचे दर 20 टक्क्यांवरुन 400 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहेत. त्याचा थेट फायदा कर्करोग, डेंग्यू, ब्लॅक फंगससह इतर अनेक आजारांच्या रुग्णांना होईल. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशातील 10 कोटी गरीब कुटुंबांवर उपचार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट 400 आरोग्य पॅकेजच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यामध्ये काळ्या बुरशीसारख्या आजारांसाठी नवीन वैद्यकीय व्यवस्थापन पॅकेज देखील जोडले गेले आहे. हे बदल 1 नोव्हेंबरपासून लागू होतील.
सरकारच्या ‘SMILE’ या नवीन योजनेद्वारे आता ट्रान्सजेंडर्सना आयुष्मान भारत अंतर्गत वैद्यकीय संरक्षणही मिळणार आहे आणि या विमा अंतर्गत लिंग परिवर्तन सारख्या शस्त्रक्रियादेखील होणार आहे. सरकारकडून ट्रान्सजेंडरना मिळालेली ही एक मोठी भेट आहे.
आयुष्मान भारत अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात. या मर्यादेत कोणताही बदल नाही. पूर्वीप्रमाणेच एका कुटुंबाला एका वर्षात 5 लाखांपर्यंत उपचार मिळू शकतात.ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य योजना असून जिचा 50 कोटी पेक्षा जास्त लोकांना फायदा होतो आहे. या योजनेअंतर्गत, देशातील खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुविधा उपलब्ध आहेत.आयुष्मान भारतमध्ये 1,669 प्रकारच्या वैद्यकीय पॅकेजचा समावेश आहे. यामध्ये 1080 सर्जिकल, 588 मेडिकल आणि एका अन्य पॅकेजचा समावेश आहे. या केलेल्या बदलांमुळे खाजगी रुग्णालयांत गरीब लोकांना उपचार घेण्याची संधी मिळेल आणि खिशातून कोणताही अतिरिक्त पैसा खर्च करावा लागणार नाही.


