आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण शासनाच्या प्राधान्यक्रमावर – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
75

पुणे, दि.20:  कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना सातत्यपूर्ण दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण राज्य शासनाच्या प्राधान्यक्रमावर आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

लोणावळा येथे उपजिल्हा रुग्णालय तसेच विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी आमदार दिगंबर भेगडे आदी उपस्थित होते.

नागरिकांचे आरोग्य शासनाच्या प्राधान्यक्रमावर असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, कोरोना संकटाचा अनुभव लक्षात घेता दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याअंतर्गत लोणावळा शहरात 100 खाटांचे स्वतंत्र उपजिल्हा रुग्णालय उभे करण्यात येत आहे. लोणावळा व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना पुढील काळात उत्तम उपचार सुविधांसाठी हे रुग्णालय उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण तसेच  दर्जेदार आरोग्य सुविधेसाठी आरोग्य विभागाला आवश्यक निधी देण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालयासोबतच अनेक प्रकारच्या आरोग्य सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. 41 कोटी रुपये खर्च करून लोणावळा शहरात उभारण्यात येणाऱ्या 100 खाटांच्या रुग्णालयात सर्व सोईसुविधा असणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

श्री. पवार पुढे म्हणाले, लोणावळा शहरासह मावळ परिसरातील विकासकामासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे. महाबळेश्वरनंतर थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळा परिसराच्या सर्वांगीण विकासासोबतच पर्यटन विकासाला गती देण्यासाठी योजना हाती घेण्यात येणार आहेत. पर्यटन क्षेत्राचा विकास तसेच त्या माध्यमातून रोजगार वाढीसोबतच या परिसरात आर्थिक सुबत्ता यावी, यासाठी शासनातर्फे सहकार्य करण्यात येईल असेही हे म्हणाले. कोरोनाचे संकट अजून टळलेले नसल्याने कोरोना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

खासदार श्री.बारणे म्हणाले, लोणावळा हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण शहर आहे. नव्याने उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयामुळे स्थानिक नागरिक तसेच येणाऱ्या पर्यटकांनाही आरोग्य सुविधा मिळतील. राज्यातील सर्वसामान्य नागरिक समोर ठेवून शासन विविध विकासयोजना राबवत आहे, या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

लोणावळा शहरातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी दर्जेदार उपजिल्हा रुग्णालय उभे रहात असल्याचा आनंद वाटतो, असे आमदार शेळके म्हणाले.

कार्यक्रमाला आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापुरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, तहसीलदार मधुसूदन बर्गे, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here