उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज सिंधुदुर्ग दौरा ; मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडीत जाहीर सभा
सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे उद्या, रविवार, ३० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक प्रचारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या सभांचा तपशील शिवसेना नेते व आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
श्री. केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री शिंदे यांची पहिली जाहीर सभा दुपारी ३.३० वाजता मालवण येथील टोपीवाला मैदानावर होणार आहे. त्यानंतर दुसरी सभा सायंकाळी ४.३० वाजता वेंगुर्ला येथील बॅरिस्टर नाथ फाउंडेशन कोकण डेव्हलपमेंट सभागृहात आयोजित केली आहे.
दिवसातील तिसरी आणि महत्त्वाची सभा सायंकाळी ५.४५ वाजता सावंतवाडीच्या गांधी चौकात पार पडणार आहे. या सर्व सभा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जात असून, उपमुख्यमंत्री शिंदे आपल्या प्रचार भाषणातून जिल्ह्यातील विकास, शासनाच्या योजना आणि पुढील राजकीय दिशेबाबत मार्गदर्शन करणार आहेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी बोलताना आमदार दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या संख्येने सभांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले. “उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांना नवचैतन्य मिळणार असून, नागरिकांनीही या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा,” असे ते म्हणाले.
उद्या होणाऱ्या या तीन सभांमुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.


