‘एअर इंडिया’ आणि ‘टाटा सन्स’!

0
65

कर्जाच्या ओझ्याने वाकलेली ‘एअर इंडिया’ ही हवाई वाहतूक कंपनी अखेर ‘टाटा सन्स’ने १८ हजार कोटी रुपयांना खरेदी केली. ‘एअर इंडिया’ कंपनी टाटांनीच सुरू केली होती. ‘टाटा सन्स’ने १८ हजार कोटी रुपयांची बोली लावल्याचे शुक्रवारी गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने जाहीर केले.आता ६८ वर्षांनी एक वर्तुळ पूर्ण होऊन कंपनी पुन्हा ‘टाटा सन्स’कडे आली आहे.

‘एअर इंडिया’च्या सर्व मालमत्ता आणि कंपनीवर असलेल्या सुमारे १५ हजार ३०० कोटींच्या कर्जासह ‘टाटा सन्स’ने १८ हजार कोटी रुपयांची बोली लावली. उर्वरित २,७०० कोटी रुपये टाटा सरकारला रोख स्वरूपात देणार असल्याची माहिती गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांता पांड्ये यांनी दिली.पहिल्या वर्षी सर्व कर्मचाऱ्यांना कायम ठेवले जाईल आणि दुसऱ्या वर्षापासून स्वेच्छानिवृत्ती योजना सुरू होईल.टाटा समूहाचा सध्या  ‘एअर एशिया’ आणि ‘विस्तारा’ या कंपन्यांत मोठा वाटा आहे. आता ही तिसरी कंपनी त्यांच्याकडे आली आहे.एअर इंडियाला कर्जबाजारीपणातून बाहेर काढण्याचे आव्हान आता त्यांच्यापुढे आहे.

 जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये ‘टाटा एअरलाइन्स’ या विमान कंपनीची स्थापना केली.१७ ऑक्टोबर १९३२ रोजी कराचीहून मुंबईला या कंपनीच्या विमानाचे पहिले उड्डाण झाले. या विमानाचे वैमानिक होते, जे. आर. डी. टाटा! १९४६मध्ये ‘टाटा सन्स’ने त्याचे विभाजन करून १९४८ मध्ये एअर इंडिया आणि युरोपातील उड्डाणांसाठी एअर इंडिया इंटरनॅशनल अशा दोन कंपन्या स्थापन केल्या.ही खासगी-सरकारी भागीदारीतील पहिली विमान कंपनी होती. त्यात टाटांचा वाटा २५ टक्के होता तर सरकारचा वाटा ४९ टक्के होता, उर्वरित वाटा नागरिकांचा होता. १९५३ मध्ये एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.टाटा समूहाने डिसेंबर २०२० मध्येच ही कंपनी खरेदी करण्याचा इरादा व्यक्त केला होता. आता तो पूर्ण झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here