प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
मुंबई- एसटी महामंडळाने भारतीय स्टेट बँक व स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकांशिवाय कर्मचाऱ्यांना फेडरल बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसी बँकेसारख्या खासगी बँकेमध्ये वेतन खाते उघडण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आधीच उतरती कळा लागलेली स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँक आणखी अडचणीत येणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे बहुतांश व्यवहार स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेतून चालतात. पूर्वी एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांना भारतीय स्टेट बँक व स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकमध्ये पगार खाते उघडणे बंधनकारक होते. मात्र, आता एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना पगार खाते उघडण्यास सूट दिली आहे.
ज्यामध्ये भारतीय स्टेट बँक व स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेव्यतिरिक्त फेडरल बँक, एचडीएफसी बँक तसेच आयसीआयसीआय बँकेमध्ये वेतन खाते उघडण्याचा सूचना एसटी महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. याबाबत परिपत्रकसुद्धा काढण्यात आले आहे.


