सिंधुदुर्ग:
एस.टी. संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आंदोलने /निदर्शने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, विजय दिन, काळा दिन तसेच जिल्हायातील आगमी निवडणुकीच्या अनुषंगाने होणारे मेळावे इंधन दरवाढ व इतर कारणास्तव विविध संघटनांकडून होणारी आंदोलने- निदर्शने यादरम्यान जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हादंडाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी त्यांना प्राप्त झालेल्या शक्तींचा वापर करून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागामध्ये दि. 16 डिसेंबर 2021 रोजीपर्यंत मनाई आदेश लागू केला आहे.
या आदेशात म्हटले आहे. राज्य परिवहन विभागातील विविध कामगार/कर्मचारी संघटना यांनी रा.प.कर्मचारी यांना शासनात विलिनीकरण करावे, या मागणीकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात संप पुकारलेला असून कर्मचारी व संघटना आक्रमक झालेल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रा.प.कर्मचारी यांचा संप सुरु असून संपाचे अनुषंगाने जिल्ह्यात आंदोलने/निदर्शने होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दिनांक 06.12.2021 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, विजय दिन, काळा दिवस साजरा करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात्मक कार्यक्रमामध्ये सक्रीय सहभाग घेणे, मेळावे इ. आयोजन करीत असल्यामुळे एखादी घटना / कार्यक्रमातून तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व इतर कारणावरून विविध संघटनांचे कार्यकर्ते एकमेकांवर टीका टिपणी करत आहेत. सदर कारणावरून विविध संघटनाकडून आंदोलने / निदर्शने होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वरील विविध कारणावरुन सिंधुदुर्ग जिल्हयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी याकरिता सिंधुदुर्ग जिल्हयाचे संपूर्ण भूभागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(अ) ते (फ) आणि 37(3) प्रमाणे दिनांक 02/12/2021 रोजी 00.01 वाजलेपासून ते दिनांक 16/12/2021 रोजी 24.00 वा. पर्यंत मनाई आदेश निर्गमित होणेस विनंती केलेली आहे. आणि ज्याअर्थी वरील कालावधीत कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे अशी माझी खात्री झालेली आहे. त्याअर्थी, मी के. मंजुलक्ष्मी, जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग मला प्राप्त असलेल्या शक्तींचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) व 37(3) नुसार दिनांक 02/12/2021 रोजी 00.01 वाजलेपासून ते दिनांक 16/12/2021 रोजी 24.00 वा. वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्हयाचे संपूर्ण भूभागात खालील कृत्य करण्यांस मनाई करीत आहे.
कलम 37(1) नुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दांडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे. अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेवून फिरणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे ( ज्या कारणामुळे समाजाच्या भावना दुखविली जाण्याची शक्यता असते.) सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे. सभ्यता अगर निती याविरुद्ध अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे, अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे. कलम 37(3) नुसार जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे, मिरवणुका काढणे व सभा घेणे. हा हुकुम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिर्दीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधीत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संबंधीत विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना आणि लग्न इत्यादी धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही.
वरील कालावधीतील मिरवणूकांना परवानगी देण्यांचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यांस परवानगी देण्यांचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्हयातील पोलीस ठाणे प्रभारी अधिका-यांस राहील. वरील आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील