ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नव्या स्वरुपाने जगभरात चिंता वाढली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डीसीजच्या डॉ. वसीला जसत यांच्या म्हणण्यानुसार, याअगोदर कोविड संक्रमणकाळात इतक्या मोठ्या संख्येत लहान मुलांना संक्रमणाचा फटका बसला नव्हता. मुलांना रुग्णालयात दाखल करण्याचीही गरज लागली नव्हती.कोरोना संक्रमणाच्या तिस-या लाटेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांत पाच वर्षांखालील मुलांचाही समावेश आहे. यामध्ये १५ ते १९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांनाही रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. आता चौथ्या लाटेच्या सुरूवातीस, सर्व वयोगटातील रुग्णांचा समावेश असला तरी विशेषत: पाच वर्षांखालील मुलांमध्ये संसर्ग वाढल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे, असेही डॉ. जसत यांनी नमूद केले आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, इतर वयोगटाच्या तुलनेत संक्रमणाचे प्रमाण लहान मुलांमध्ये अद्याप कमी आहे. सर्वाधिक संक्रमण ६० वर्षांहून अधिक वयाच्या रुग्णांमध्ये दिसून येत आहे. त्यानंतर पाच वर्षांखालील मुलांमध्ये हे संक्रमण दिसून येत आहे. पाच वर्षांखालील मुले रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी असे दिसून आलेले नव्हते.दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या नव्या रुग्णांमध्ये लहान बालकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे दिसून आले आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या तज्ज्ञांनीदेखील या नव्या ट्रेन्डवर चिंता व्यक्त केली.दक्षिण आफ्रिकेत शुक्रवारी रात्रीपर्यंत कोरोनाबाधित १६,०५५ रुग्णांना दाखल करण्यात आले होते तर २५ कोरोनाबाधितांचा मृत्यू नोंदवण्यात आला.