रत्नागिरी – सुमारे ९० हजार रुपयांचा १० टन कांदा खरेदीचा व्यवहार करून त्यापैकी ४५ हजार रुपये ॲडव्हान्स देऊनही कांदा न पाठवता फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ मे रोजी सकाळी १०.४२ वाजण्याचा सुमारास घडली.
दयाशंकर मिश्रा आणि संजय कुमार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात प्राजक्ता प्रवीण किणे (४५, रा. मारुती मंदिर, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, स्वस्त दरात कांदा खरेदी करण्यासाठी त्यांनी नामांकित जस्ट डायलवर फोन करून होलसेल व्यापाऱ्यांची लिस्ट घेतली होती. त्यापैकी बनके बिहारी ट्रेडर्सला फोन करून १० टन कांद्याचा व्यवहार करून ४५ हजार ॲडव्हान्स दिले.
परंतु, २८ मे रोजी सकाळी ट्रकचालक संजय कुमारने किणे यांना फोन करून ट्रक रत्नागिरीजवळ आला आहे़ उर्वरित पेमेंट करा असे सांगितले. पण गाडी आल्याशिवाय पेमेंट करणार नाही असे किणे यांनी संजय कुमारला सांगितल्यावर त्याने आपला मोबाइल बंद केला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच किणे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.