अफगाणिस्तानची राजधानी काबूल काल, गुरुवारी दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटांनी हादरलं. गुरुवारी सायंकाळी काबूलच्या हमीद करझाई एअरपोर्टवर दोन भीषण आत्मघाती बॉम्बस्फोट झाले. यात 60 जण जागीच ठार तर 140 हून अधिक नागरिक जखमी झाले. मृतांमध्ये 13 अमेरिकी नौदल कमांडो आणि एका आरोग्य सेवकाचा समावेश आहे. या स्फोटांची जबाबदारी आयसिस-केपीने (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लँव्हेंट खुरासन प्रांत- ISIS-K) स्विकारली आहे.
या हल्ल्यानंतर अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने आपत्कालीन बैठक बोलावली आहे. पहिला स्फोट सायंकाळी ७ वाजता विमानतळाच्या बाहेर एबी गेटवर झाला. आत्मघाती हल्लेखोरोने स्वत:ला उडवले. दुसरा स्फोट बॅरन हॉटेलजवळ झाला. दोन्ही ठिकाणी सुमारे 5 हजार लोक होते. या वेळी चेंगराचेंगरी झाल्याचं वृत्त आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आपत्कालीन बैठक घेतली. इस्रायलचे पीएम बेनेटसोबतची बैठक लांबणीवर टाकली. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही आपत्कालीन बैठक बोलावली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले, फ्रेंच राजदूत काबूल सोडतील, पॅरिसहून काम करतील. रशियाचे मंत्री म्हणाले, आम्ही काबूलमधील स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. भारताने दु:ख व्यक्त केले. अतिरेक्यांना आश्रय देणाऱ्यांविरुद्ध एकजुटीचाही पुनरुच्चार केला आहे