
काल्हेरला मिळणार अतिरिक्त 2.44 MLD पाणीपुरवठा; खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश
भिवंडी- भिवंडी तालुक्यातील काल्हेर परिसरातील वाढत्या पाणीटंचाईच्या समस्येवर अखेर मोठा उपाय सापडला आहे. स्थानिक नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विचार करून मुंबई महानगरपालिका (BMC) यांनी काल्हेरसाठी अतिरिक्त 2.44 MLD पाणीपुरवठ्याला मंजुरी दिली आहे. यामुळे आता काल्हेरचा एकूण पाणीपुरवठा 3.60 MLD वरून थेट 6.04 MLD इतका वाढणार आहे, ज्यामुळे पाणीटंचाईत मोठा दिलासा मिळणार आहे.
पठपुरावा आणि मागणीला मिळाले यश
काल्हेर परिसरातील गंभीर होत चाललेल्या पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेऊन भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. श्री. सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे तसेच मा. श्री. सुमित (भाई) म्हात्रे यांनी मुंबई महानगरपालिकेकडे अतिरिक्त पाणीपुरवठ्याची तातडीची मागणी केली होती. समस्येचे गांभीर्य ओळखून दोन्ही जनप्रतिनिधींनी बीएमसी अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधला आणि संबंधित विभागांकडे पुरेशा पाठपुराव्याने हा प्रस्ताव पुढे सरकवला.
BMC कडून मंजुरी – नागरिकांना मोठा दिलासा
बीएमसीने नुकतीच दिलेल्या उत्तरात काल्हेरसाठी अतिरिक्त 2.44 MLD पाणीपुरवठ्यास हिरवा कंदील दाखवला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे वाढलेल्या पाण्याच्या गरजांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे काल्हेर परिसरातील पाणीपुरवठा पूर्वीपेक्षा अधिक सुकर आणि शिस्तबद्ध होणार असून नागरिकांना पाण्यासाठी होणाऱ्या त्रासापासून मोठी दिलासा मिळेल.
लवकरच सुरू होणार अंमलबजावणी प्रक्रिया
बीएमसीमार्फत अतिरिक्त पाणीपुरवठ्याच्या वितरण व्यवस्था, पाईपलाईन दुरुस्ती/वृद्धीकरण, पंपिंगस्टेशन व्यवस्थापन आदी कामांची पुढील प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा कार्यक्षम आणि स्थिर राहण्यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक बाबी बीएमसी स्वतःच्या देखरेखीखाली पार पाडणार आहे.
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
काल्हेर परिसरात वाढत्या ताणलेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढत होत्या. अतिरिक्त पाणीपुरवठ्याचा निर्णय जाहीर होताच परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. अनेकांनी खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे आणि सुमित (भाई) म्हात्रे यांच्या प्रयत्नांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. भविष्यातही अशाच प्रकारे स्थानिक प्रश्नांकडे लक्ष देत नागरिकांच्या सुविधा वाढवण्याचे प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास जनप्रतिनिधींनी व्यक्त केला आहे.

